रविवारच्या मेगाब्लॉकनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी सोमवारी हार्बर रेल्वेवर तांत्रिक अडचणीमुळे लोकल सेवा विस्कळीत झाली. सकाळी १०.५० वाजता रे रोड आणि कॉटन ग्रीन स्टेशन दरम्यान अप मार्गावर लोकल डब्यात तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने हार्बरवर अर्धा ते पाऊण तास गोंधळ उडाला होता. सकाळी ११.१५ दरम्यान बिघाड दुरुस्त झाल्यानंतर वाहतूक हळुहळू पूर्ववत झाली.
हार्बरवर झालेल्या गोंधळामुळे तीन लोकल कुर्ल्यावरून मेनलाइनवर वळवण्यात आल्या. तीन लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यात दोन पनवेल आणि एका बेलापूर लोकलचा समावेश आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी वडाळ्यावरून पनवेलसाठी दोन आणि वांद्रेसाठी एक विशेष लोकल सोडली. ऐन गर्दीच्या वेळेस सीएसटीकडे जाणाऱ्या लोकल रखडल्याने प्रवाशांचे हाल झाले. दुरुस्तीस अर्धा तास लागल्यानंतर वाहतूक सुरू झाली.