| फलाटांच्या लांबीचे काम रखडले by Mafia on 21 July, 2013 - 03:00 AM | ||
|---|---|---|
Mafia | फलाटांच्या लांबीचे काम रखडले on 21 July, 2013 - 03:00 AM | |
मुंबई- हार्बर मार्गावर सुरू होणा-या १२ डब्यांच्या लोकलसाठी १४ स्थानकांवरील फलाटांची लांबी वाढवणे आता पावसाळ्यानंतरच वेग घेणार आहे. दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेले हे काम अनेक परवानग्या आणि अडचणींमुळे रेंगाळले आहे. आता पावसाळ्यानंतरचा मुहूर्त या कामांना मिळणार असल्यामुळे हार्बरच्या प्रवाशांना बारा डब्यांच्या लोकलसाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. एमआरव्हीसीमार्फत ७१४ कोटी रूपये खर्च करून हार्बरवरील १४ स्थानकांच्या फलाटांची लांबी वाढवली जाणार आहे. त्यानुसार सँडहस्र्ट रोड, गोवंडी, चेंबुर आणि किंग्ज सर्कल येथील कामे हातात घेण्यात आली मात्र ती अर्धवट अवस्थेत आहेत. तर रे रोड, कॉटनग्रीन या स्थानकांच्या फलाटांची लांबी वाढवण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टची परवानगी घ्यावी लागणार आहे. ती अजूनही मिळाली नसल्याने या दोनही ठिकाणी काम होऊ शकलेले नाही, असे एमआरव्हीसीच्या माहितगाराने सांगितले. वडाळा, चुनाभट्टी, कुर्ला आणि मानखुर्द या स्थानकातील फलाटाचे तर काम अद्याप सुरूही झालेले नाही. सीएसटीमधील हार्बर मार्गाच्या फलाटांची लांबी वाढवण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडे पडून आहे. त्या परवानगीसाठी एमआरव्हीसीला प्रतिक्षा करावी लागत आहे. या ठिकाणची लांबी वाढवताना मोठा ब्लॉक घ्यावा लागणार आहे. या फलाटांच्या लांबीचे काम सर्वात शेवटी घेतले जाणार आहे. मात्र या सर्व बाबींमुळे फलाटांच्या लांबीचे काम आणि हार्बरवरील १२ डब्यांची गाडी सेवा काही महिने पुढे गेली आहे. | ||