| कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत by greatindian on 27 June, 2013 - 12:01 PM | ||
|---|---|---|
greatindian | कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत on 27 June, 2013 - 12:01 PM | |
लांजा- सतत पाऊस असूनही सुरळीत चाललेल्या कोकण रेल्वेच्या वाहतुकीला मंगळवारी गालबोट लागले. तुफानी पावसामुळे तालुक्यातील आडवली व विलवडे रेल्वेस्थानकादरम्यान असलेल्या बेर्डेवाडी बोगद्यानजीक दरड कोसळून भलामोठा दगड रेल्वे ट्रॅकवर आला. या वेळी नेत्रावती एक्स्प्रेस येत होती. मात्र ट्रॅकमन आणि मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य अपघात टळला. संततधार पावसामुळे सकाळी सव्वानऊच्या सुमारास बेर्डेवाडी बोगद्याजवळ १.०५ क्युबिक मीटर दरड रेल्वे ट्रॅकवर कोसळली. या ठिकाणी असणा-या डोंगराचा रेल्वे ट्रॅकला धोका पोहोचू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून लोखंडी संरक्षक जाळी बसवण्यात आली आहे. मात्र ही जाळी ऊन व पावसामुळे जीर्ण झाल्याने दरडीला रोखू शकली नाही. रेल्वे प्रशासनाने दरड बाजूला करण्यासाठी युद्धपातळीवर काम हाती घेण्यात आले. पावसामुळे यात अडचणी येत होत्या. अखेर अडीच तासांत ही दरड बाजूला करण्यात आली व दुपारी १२ वाजता रेल्वे सेवा सुरळीत झाली. या घटनेचा फटका कोकण रेल्वेला बसला. जनशताब्दी एक्स्प्रेसही रत्नागिरी स्थानकात थांबवण्यात आली. या घटनेमुळे नेत्रावती, जनशताब्दीसह सावंतवाडी-दिवा पॅसेंजर, गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस गाड्या विलंबाने धावत होत्या. | ||