| मध्य रेल्वेवरील १५ डबा लोकल वादात by RailXpert on 01 June, 2013 - 04:00 PM | ||
|---|---|---|
RailXpert | मध्य रेल्वेवरील १५ डबा लोकल वादात on 01 June, 2013 - 04:00 PM | |
मुंबई- मध्य रेल्वेवरील पंधरा डब्यांची लोकल वादात सापडली आहे. ही लोकल चालवण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाची पुन्हा परवानगीच घेतलेली नाही. त्यामुळे ही लोकल अनधिकृतपणे चालवली जात आहे, असे रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाचे म्हणणे आहे. दरम्यान, लोकल चालवण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण केल्याचा दावा मध्य रेल्वे प्रशासनाने केला आहे. मध्य रेल्वेवर ऑक्टोबर २०१२ पासून १५ डब्यांची एक लोकल चालवली जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ही लोकल चालवण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाने रेल्वेला ऑक्टोबर २०१२ ते डिसेंबर २०१२ पर्यंत प्रायोगिक तत्त्वावर परवानगी दिली होती. त्यानंतर ही गाडी सुरक्षेच्या दृष्टीने चालवणे कितपत योग्य आहे, याचा अहवाल रेल्वेने सुरक्षा आयुक्तालयाला देणे बंधनकारक होते. त्यानंतर ही लोकल नियमित चालवण्यासाठी परवानगी दिली जाणार होती. मात्र, असा कोणताही अहवाल म.रे.ने दिला नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यानंतर ही लोकल अनधिकृतपणे चालवली जात असल्याचा दावा रेल्वेचे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी केला आहे. दरम्यान, त्यांचा हा दावा मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मुकेश निगम यांनी फेटाळला असून, या लोकलच्या सुरक्षेबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण करून दोन वेळा ती आयुक्तालयाकडे पाठवली असल्याचे त्यांनी सांगितले. अमन लॉज ते माथेरान दरम्यान धावणारी शटल ट्रेनही अनधिकृतपणे चालवली जात असल्याचे रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाने सांगितले. | ||