Indian Railways News => Topic started by railgenie on Jun 19, 2013 - 21:00:45 PM


Title - १८ हजार प्रवाशांनी रद्द केला प्रवास
Posted by : railgenie on Jun 19, 2013 - 21:00:45 PM

रेल्वेची लेटलतिफी : लाखो रुपयांचा फटका
नागपूर : मागील १५ दिवसांपासून पावसामुळे रेल्वेगाड्या उशिरा येण्याचे सत्र सुरू आहे. यामुळे अनेक प्रवाशांच्या प्रवासात खोळंबा निर्माण झाला असून या कालावधीत नागपुरात तब्बल १८ हजार प्रवाशांनी आपला प्रवासाचा बेत रद्द करून तिकिटे रद्द केली. यामुळे रेल्वेला लाखो रुपयांचा फटका बसला आहे.
पावसामुळे मागील १५ दिवसांपासून रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. अनेक रेल्वेगाड्या २ ते ५ तास उशिराने धावत आहेत. यामुळे रेल्वेगाड्यांची वाट पाहून वैतागलेल्या प्रवाशांवर आपला प्रवासच रद्द करण्याची पाळी आली. या कालावधीत तब्बल १८ हजार ११ प्रवाशांनी आपली तिकिटे रद्द केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरून पुढे आली आहे. यात १ जूनला १५५३ प्रवासी, २ जूनला ९४८, ३ जूनला ११४८, ४ जूनला ११७५, ५ जूनला १२६४, ६ जूनला १४२३, ७ जूनला १४१३, ८ जूनला १२६१, ९ जूनला ८८८, १0 जूनला १३00, ११ जूनला १0३४, १२ जूनला ९९७, १३ जूनला ९४४, १४ जूनला १00७, १५ जूनला १0५१ आणि १६ जूनला ६0५ प्रवाशांनी आपली तिकिटे रद्द केल्याची नोंद रेल्वे प्रशासनाने केली आहे.
एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर प्रवाशांनी आपली तिकिटे रद्द केल्यामुळे रेल्वेला लाखो रुपयांचा फटका बसला आहे. रेल्वेच्या विस्कळीत झालेल्या वेळापत्रकामुळे अनेक प्रवाशांना मन:स्ताप सहन करावा लागत असून त्यांना ताटकळत रेल्वेस्थानकावर बसण्याची पाळी आली आहे. (प्रतिनिधी)
पावसाळ्यात घ्यावी काळजी
पावसात रेल्वेचे रुळ पाण्याखाली जाण्याच्या घटना नेहमीच घडतात. अनेकदा रेल्वेस्थानकावर गाडीची वाट पाहणार्‍या प्रवाशांना ‘लेट’ येणारी रेल्वेगाडी नेमकी किती उशिरा येणार आहे, याची माहिती अध्र्या-अध्र्या तासाने देण्यात येते. त्यामुळे अर्धा तास झाला की गाडीत बसण्याची मानसिकता केलेल्या प्रवाशांना मन:स्ताप होतो.