Indian Railways News => Topic started by puneetmafia on Jul 27, 2013 - 00:01:03 AM


Title - सातव्या दिवशी रेल्वे आली रुळावर
Posted by : puneetmafia on Jul 27, 2013 - 00:01:03 AM

अप लाईन सुरू : एक हजार गँगमनच्या परिश्रमातून झाला मार्ग खुला
नागपूर : सात दिवसांपासून विस्कळीत झालेली नागपूर-वर्धा दरम्यानची रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात रेल्वे प्रशासनाला गुरुवारी यश आले. सात दिवस एक हजार गँगमन आणि अधिकार्‍यांनी दिवसरात्र काम करून अप आणि डाऊन लाईन सुरू केली. अपलाईनवरून आज सकाळी १0.३0 वाजता गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस रवाना झाली.
शुक्रवारी रात्री ८.३0 च्या सुमारास नागपूर वर्धा सेक्शन दरम्यान सिंधी ते तुळजापूर रेल्वेस्थानकामध्ये २४५ मिलिमीटर पाऊस पडल्याने या मार्गावरील दोन पुलाखालील माती, गिट्टी वाहून गेल्यामुळे मुंबई-हावडा मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच ‘डीआरएम’ बृजेश दीक्षित यांच्यासह रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. रेल्वे रुळावर चार इंच पाणी आले होते. याशिवाय रेल्वेगाड्यांना विजेचा पुरवठा करणार्‍या ओव्हर हेड इक्विपमेंटचे खांबही हलत होते. रेल्वेची दूरसंचार यंत्रणाही ठप्प पडली होती. युद्धस्तरावर कामाला सुरुवात केल्यानंतर सोमवारी डाऊन लाईनचे काम पूर्ण करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले होते. त्यानंतर या मार्गावरील अप लाईनच्या कामाला सुरुवात करण्यात आली. एक हजार गँगमनने १२ जेसीबीच्या साह्याने दिवसरात्र काम करून ३६0 मीटरच्या मार्गावरील रेल्वे ट्रॅकखाली माती, गिट्टी टाकली.
गुरुवारी सकाळी अप लाईनचे काम पूर्ण करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले. रेल्वेच्या नागपूर विभागाच्या इतिहासात मागील १६0 वर्षांंत एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वाहतूक विस्कळीत होण्याचा हा पहिला प्रसंग असल्याची माहिती ‘डीआरएम’ बृजेश दीक्षित यांनी पत्रकारांना दिली.
अशा प्रकारचे १0 ते १२ प्रसंग आपण आतापर्यंंत हाताळल्याने आधीच पाठीशी अनुभव असल्याचे ते म्हणाले. सुरळीत झालेल्या अप लाईनच्या रुळाचे काही काम करावयाचे असल्यामुळे गुरुवारी रात्री १0 ते शुक्रवारी दुपारी २ पर्यंंत १७ तासाचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत होणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. सध्या या मार्गावरून पूल वाहून गेलेल्या ठिकाणी २0 किलोमीटर प्रति तास या वेगाने रेल्वेगाड्या चालविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)