Indian Railways News => Topic started by railenquiry on Jun 27, 2013 - 09:01:05 AM


Title - वसईतील ६५ यात्रेकरू हरिद्वारच्या रेल्वेने वसईला परतले
Posted by : railenquiry on Jun 27, 2013 - 09:01:05 AM

वसई- उत्तराखंडच्या जलप्रलयात अडकलेले वसईतील ६५ यात्रेकरू मंगळवारी खास हरिद्वारच्या रेल्वेने वसईला परतले. मात्र या वेळी त्यांची विचारपूस करायला अथवा त्यांना मदतीचा आधार द्यायला स्थानिक प्रशासन, राजकीय नेते पुढे आले नाहीत. त्यामुळे परराज्यात आलेल्या जीवघेण्या संकटापेक्षा आपल्याच भागात आलेली उपेक्षा या यात्रेकरूंच्या अधिक जिव्हारी लागली.
उत्तराखंडाच्या महाप्रलयात वसईच्या नायगाव परिसरातले ६५ यात्रेकरू अडकले हाते. १४ जून रोजी ते चारधाम यात्रेसाठी गेले होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचे नातेवाईक चिंतेत होते. त्यांच्या सुखरूप परतण्याकडे नातेवाईकांचे डोळे लागले होते. तब्बल १० दिवसांनी हे यात्रेकरू वसईत परतले. उत्तरकाशीच्या ब्रह्मखाळ परिसरात होते. अचानक अतिवृष्टी झाली आणि ते तेथेच अडकून राहिले. पाय गारठल्याने त्राण उरला नव्हता इतका प्रचंड पाऊस होत होता, अशी माहिती पांडुरंग गंगीकर आणि नारायण गंगेकर-कोळी या यात्रेकरूंनी दिली. आपल्या आयुष्यात पहिल्यांदा आपण निसर्गाचा एवढा मोठा तांडव पाहिल्याचेही त्यांनी सांगितले.
वीजपुरवठा खंडित झाला होता, मोबाइलचे नेटवर्कही अधूनमधून जात होते. त्यामुळे नेमके काय घडतेय हेच कळत नव्हते. वृत्तवाहिन्यांवर जेव्हा वसईतील नातेवाइकांनी उत्तराखंडमधील जलप्रलयाच्या बातम्या पाहिल्या. तेव्हा नातेवाइकांनी आपल्याशी मोबाइलवरून संपर्क साधला. त्यावेळी उत्तराखंडमध्ये काय घडतेय ते कळले. त्यामुळे आम्हाला ब्रह्मखाळ येथेच अडकून राहावे लागले. ज्यांनी जेवणाचे साहित्य आणले होते, त्यांनी जेवण बनवले. मात्र पाण्याअभावी खूपच हाल सोसावे लागले. तिथल्या काहींनी तर पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. शौचालयासाठी तब्बल १५ रुपये मोजावे लागत होते. पिण्याच्या पाण्यासाठी ५० रुपये आणि बिस्किटसाठी २५ रुपये आकारले जात होते, अशी खंतही पांडुरंगबुवा यांनी व्यक्त केली.
सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान हे यात्रेकरू वसई रेल्वे स्थानकावर उतरले. वसई-विरार महापालिकेचे महापौर नारायण मानकर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनी या यात्रेकरूंना वडा व समोसा खाऊ घातला. मात्र, १० दिवसांच्या थरारक प्रवासानंतर परतलेल्या या हतबल यात्रेकरूंची ओझी उचलायला कोणीही पुढे आले नाही.
तहसीलदार अथवा प्रशासनाचे अन्य अधिकारी व कर्मचा-यांपैकी कोणीही या यात्रेकरूंची विचारपूस करण्यासाठी फिरकले नाही. घरापर्यंत पोहोचण्यासाठी या यात्रेकरूंनी स्वत:च वाहनांची शोधाशोध केली. वसई रेल्वे स्थानकावरून हे यात्रेकरू गणेशपुरी येथील गरम पाण्याच्या कुंडाजवळ गेले. तेथे अंघोळ करून त्यांनी नित्यानंद स्वामींचे दर्शन घेतले. त्यानंतर ते आपल्या घरी गेले.