Indian Railways News => Topic started by Mafia on Jul 19, 2013 - 00:00:21 AM


Title - रेल्वेस्थानक स्थलांतराबाबत महापालिका सभेत एकमत
Posted by : Mafia on Jul 19, 2013 - 00:00:21 AM

राजर्षी छत्रपती शाहू महाराज रेल्वेस्थानक शहराबाहेर मार्केट यार्डच्या जागेत स्थलांतरित करण्याबाबत आज झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांचे एकमत झाले. सदस्य राजेश लाटकर यांनी मांडलेल्या या सूचनेचे स्वागत करून महापौर सौ. प्रतिभा नाईकनवरे यांनी प्रशासनाला आदेश दिला, की यासंदर्भातील प्रस्ताव शक्‍य तितक्‍या लवकर महासभेसमोर मांडावा.

श्री. लाटकर म्हणाले, ""सध्याची इमारत आणि जागा ऐतिहासिक ठेवा म्हणून जतन करून रेल्वेस्टेशन मार्केट यार्डच्या जागेत नेल्यास शहरातील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्‍न संपुष्टात येईल. पक्षीय मतभेद विसरून दोन्ही मंत्री, दोन्ही खासदार आणि दहा आमदार, महापालिका, जिल्हा परिषद यांनी एकत्र येऊन हा विषय मार्गी लावावा.'' ही सूचना सर्वच सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात उचलून धरली.

श्री. लाटकर म्हणाले, ""वाहतूक कोंडीचा प्रश्‍न गंभीर आहे. यावर उपाय शोधण्याची हीच वेळ आहे. रेल्वेस्टेशन सध्या शहराच्या मध्यभागी आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये भरच पडत आहे. मार्केट यार्ड येथे रेल्वेगुडस्‌ यार्ड आहे. तेथे जागाही मोठी आहे. गुडस्‌ यार्डची दुरवस्था आहे. त्यामुळे ही जागा रेल्वेस्टेशन म्हणून विकसित करावी. केंद्रीय रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे कर्नाटकातील आहेत. आयुक्‍त बिदरी यांचे तेच माहेर आहे. त्यांनी कौटुंबिक जिव्हाळ्याने यासाठी प्रयत्न करावेत. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी पक्षीय मतभेद विसरून यासाठी प्रयत्न करावेत.''

ते म्हणाले, ""लक्ष्मीपुरीतील धान्यबाजारासाठीही मार्केट यार्डशेजारचीच जागा आहे. त्यामुळे रेल्वेस्टेशन आणि धान्यबाजाराचे स्थलांतर झाल्यास वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्‍न निकालात निघेल. परीख पूल, टेंबलाई रेल्वेफाटक उड्डाणपूल असे सर्वच प्रश्‍न यामुळे सुटू शकतील.''

महापौर सौ. प्रतिभा नाईकनवरे यांनीही वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजनांवर भर द्यावा, रस्ते रुंदीकरण करा, प्रस्तावित डी. पी. रोड विकसित करा अशा सूचना केल्या. वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी काही सूचना केल्या आहेत, त्याचेही वाचन करण्यात आले.