Indian Railways News => Topic started by AllIsWell on May 30, 2012 - 03:00:10 AM


Title - रेल्वेचा उद्या पाच तास मेगा ब्लॉक
Posted by : AllIsWell on May 30, 2012 - 03:00:10 AM

कामशेत-मळवलीदरम्यान रेल्वेपुलाचे मजबुतीकरण

पुणे- कामशेत-मळवली यादरम्यान रेल्वेपुलाचे मजबुतीकरण करण्यात येणार असल्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक बुधवारी सकाळी सव्वानऊपासून दुपारी पावणेतीनपर्यंत साडेपाच तास बंद राहणार आहे; त्यामुळे पुणे-लोणावळा लोकलसह डेक्कन एक्‍स्प्रेस आणि अन्य गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

या कामामुळे पुणे-कर्जत-पुणे रेल्वे रद्द करण्यात आली आहे. मुंबईहून सुटणारी डेक्कन एक्‍स्प्रेस केवळ लोणावळ्यापर्यंत धावेल, तर हीच गाडी लोणावळ्यावरून मुंबईकडे रवाना होणार आहे. पुण्यावरून सकाळी 8 वाजून 57 मिनिटांनी, 9 वाजून 55 मिनिटांनी, 11 वाजून 30 मिनिटांनी; तसेच बारा आणि एक वाजता निघणारी पुणे-लोणावळा लोकल लोणावळ्याऐवजी तळेगावपर्यंतच धावणार आहे; तर लोणावळ्यावरून पुण्याकडे सकाळी 9 वाजून 35 मिनिटांनी, 10 वाजून 27 मिनिटांनी, 11 वाजून 30 मिनिटांनी, दुपारी 2 वाजता आणि 2 वाजून 55 मिनिटांनी धावणारी लोकल लोणावळ्याऐवजी तळेगाववरूनच पुण्यास परतणार आहे.

मुंबईतून सकाळी 8 वाजून 5 मिनिटांनी सुटणारी बंगळूर उद्यान एक्‍स्प्रेस निर्धारित वेळेऐवजी दुपारी 12 वाजून 5 मिनिटांनी सुटणार आहे. तसेच, मुंबईतून सुटणारी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोयना एक्‍स्प्रेस सकाळी 8. 40 ऐवजी दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी सुटणार आहे.

पुण्याहून दुपारी 1 वाजता सुटणारी लोणावळा लोकल पावणेदोन वाजता सुटणार असून, सकाळी 11 वाजून 58 मिनिटांनी सुटणारी लोणावळा-पुणे लोकल दुपारी 12 वाजून 26 मिनिटांनी सुटणार आहे.

दरम्यान, हैदराबाद-मुंबई एक्‍स्प्रेस, चेन्नई-मुंबई एक्‍स्प्रेस आणि कोइंबतूरहून निघणारी लोकमान्य टिळक टर्मिनस एक्‍स्प्रेस या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा साडेतीन ते पावणेपाच तास उशिरा पोचणार आहेत.