Indian Railways News => Topic started by Mafia on Jul 24, 2013 - 09:00:20 AM


Title - रेल्वे स्थानकावरील सुरक्षा वार्‍यावर..
Posted by : Mafia on Jul 24, 2013 - 09:00:20 AM

सोलापूर - सोलापूर रेल्वे स्थानकावर अगोदरच हाणामारी, चोर्‍या, जनरल डब्यात बसण्यावरून एका महिलेचा जीव जाणे अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात असतानाच आता महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सोलापूर रेल्वे स्थानकात देखील खबरदारी घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता शासनाच्या सुरक्षा यंत्रणेसमोरील आव्हान आणखी वाढले आहे.

मध्य रेल्वेतील जळगाव, भुसावळ, मनमाड आदी प्रमुख रेल्वे स्थानकावर सुरक्षेचा कडा पहारा लावला गेला आहे. दहशतवादी संघटनांनी स्थानक उडवण्याची धमकी दिली होती. कुठली स्थानके त्यांच्या हिटलिस्टवर आहेत, त्यांनी ते स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे मध्य रेल्वेतील मुंबई, पुणे, सोलापूरसह अन्य महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हे लक्षात घेत लवकरच रेल्वे पोलिसांचे सशस्त्र जवान सोलापूर रेल्वे स्थानकावर तैनात होणार आहेत. तसेच साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढविण्यात येणार आहे.

व्यवस्थेतील प्रमुख त्रुटी
मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सोलापूर रेल्वे स्थानकावर बरॅक बांधण्यात आले होते. तिथे शस्त्रधारी जवानांची नियुक्तीही होती. नंतर ते काढून घेण्यात आले. प्रवेशद्वाराजवळ बसवलेले मेटल डिटेक्टर हलवण्यात आले. स्टेशन परिसरात लक्ष ठेवण्यासाठी 22 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. मात्र, त्यांची क्षमता कमी आहे. 20 ते 25 फुटांपेक्षा अधिक लांबीचे चित्र स्पष्ट दिसत नाही. मुख्य प्रवेशद्वाराशिवाय अन्य चोरट्या मार्गाने प्रवेश सहज सोपा आहे. मालधक्क्याच्या बाजूने असलेल्या पादचारी पुलावरून कोणीही स्थानकावर सहज येऊ शकतो. या सर्व सुरक्षेत मोठय़ा त्रुटी आहेत.

सावधतेचा इशारा दिला
खबरदारीचा उपाय म्हणून सोलापूर रेल्वे स्थानकाला सावधतेचा इशारा दिला आहे. यापूर्वीच सोलापूरला 100 जवानांची तुकडी दिली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलिस कटिबद्ध आहे.’’ अनिल शर्मा, रेल्वे पोलिस महासंचालक, मध्य रेल्वे, मुंबई

साध्या वेशात गस्त
रेल्वे पोलिसांची एक तुकडी सोलापूरला मिळाली आहे. त्याचा वापर बंदोबस्तासाठी करण्यात येईल. साध्या वेशातील पोलिसांची गस्त सुरू करण्यात येईल. लवकरच एक जादा पोलिसांची तुकडी स्थानकावर देऊ.’’ सुशील गायकवाड, विभागीय जनसंपर्क अधिकारी, सोलापूर रेल्वे