Indian Railways News => Topic started by railgenie on Aug 09, 2013 - 14:59:40 PM


Title - रूळ पाण्यात, तरी उत्पन्न रुळावर
Posted by : railgenie on Aug 09, 2013 - 14:59:40 PM

नागपूर


जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे सिंदी (रेल्वे)जवळ रेल्वेचा मार्ग वाहून गेला. त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली अन् रेल्वेला मोठा आर्थिक फटका बसला. तरीदेखील एप्रिल ते जुलै या तीन महिन्यांत मागील वर्षात मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे.

१९ जुलै रोजी सिंदी रेल्वेनजीक रेल्वे मार्ग वाहून जाण्याची घटना घडली होती. हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने भीषण अपघात टळला. या मार्गाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले. तरीही मार्ग पूर्ववत व्हायला जवळपास दहा दिवस लागले. यादरम्यान अप आणि डाउन अशी दोन्ही बाजूंची वाहतूक बंद झाली होती. नागपूर-मुंबई वाहतूक बंद होण्याची रेल्वेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना होती. शेवटी रेल्वेने एसटीची मदत मागून प्रवाशांची व्यवस्था केली होती. या कालावधीत जवळपास ३० पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या. मात्र, एवढे सारे होऊनही रेल्वेची आर्थिक गाडी रुळावर दिसत आहे.

एप्रिल ते जुलै या तीन महिन्यात नागपूर मंडळाला आरक्षित प्रवाशी वाहतुकीतून ६८.९१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. मागीलवर्षी याच कालावधीत हे उत्पन्न ६३.८६ कोटी होते. म्हणजे मागील वर्षीपेक्षा यात ८ टक्क्यांनी वाढ झाली. अनारक्षित प्रवाशी वाहतुकीतून यंदा ५०.७६ कोटी रुपये मिळाले. मागील वर्षी ४०.०८ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले होते. आरक्षित आणि अनारक्षित वाहतुकीतून यंदाच्या उपरोक्त तीन महिन्यात नागपूर मंडळाला ११९.७० कोटी रुपयांचे उत्पन्न झाले आहे. मागील वर्षाचे या कालावधीचे उत्पन्न पाहता यात १५.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

माला'माल' प्रवासी वाहतुकीसहच माल वाहतुकीतूनही मिळालेले उत्पन्न वाढलेलेच आहे. रेल्वेतर्फे जी माल वाहतूक केली जाते त्यात ८० टक्के वाटा कोळशाचा आहे. उपरोक्त तीन महिन्यात यंदा ५७५.२२ कोटी रुपये कोळसा वाहतुकीतून मिळाले. मागील वर्षीपेक्षा यातच ७.६ टक्क्यांची वाढ आहे.

सक्षम सेवेचे यश! कंटेनर वाहतुकीतून झालेले उत्पन्न २७.१४ कोटी रुपये आहे. तिकीट तपासणी मोहिमेतून या कालावधीत ३.७४ कोटी रुपयांची भर रेल्वेच्या तिजोरीत पडली. मागीलवर्षी याद्वारे २.७१ कोटी रुपये मिळाले होते. वर्षभरात रेल्वेचे प्रवाशी वाहतुकीचे आणि माल वाहतुकीचे दर वाढले हे खरे असले तरी सर्वच श्रेय या वाढलेल्या दरांचे नाही तर रेल्वेच्या सक्षम सेवेचे असल्याचे रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी पी.डी. पाटील यांनी सांगितले.