Indian Railways News => Topic started by puneetmafia on Aug 25, 2013 - 00:01:18 AM


Title - मुंबई-लातूर-परळी गाडी लवकरच सुरू करणार
Posted by : puneetmafia on Aug 25, 2013 - 00:01:18 AM

परळी वैजनाथ - मागील रेल्वे अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेली मुंबई-लातूर-परळी-नांदेड ही रेल्वेगाडी लवकरच सुरू करण्यात येईल, असे आश्‍वासन केंद्रीय रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांनी खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखालील भेटलेल्या शिष्टमंडळाला दिले.

परळी रेल्वे संघर्ष समितीतर्फे मुंबई-लातूर-परळी-नांदेड रेल्वे सुरू करावी या व इतर मागण्यांसाठी अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून ता. 15 ऑगस्टला परळी रेल्वेस्थानकात रेल रोको करण्याचा इशारा देण्यात आला होता. याप्रश्‍नी भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी रेल्वेमंत्री खर्गे यांच्याशी चर्चा केली. श्री. खर्गे यांनी ही गाडी सुरू करण्यासाठी परळीतील संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांना वेळ दिला. त्यामुळे रेल रोको आंदोलन मागे घेण्यात आले. शुक्रवारी, ता. 23 खासदार श्री. मुंडे यांच्या नेतृत्वाखाली परळीतील रेल्वे संघर्ष समिती, विविध पक्षीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आदी कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळाने दुपारी रेल्वे भवनात रेल्वेमंत्री श्री. खर्गे भेट घेतली. यावेळी एक तास झालेल्या चर्चेत मुंबई-लातूर-परळी-नांदेड गाडी सुरू करण्याबरोबरच परळी रेल्वेस्थानकाचा नांदेड विभागात समावेश करावा, परळी-औरंगाबाद जलद गाडी सुरू करावी, परळी परिसरातील मालेवाडी येथे रेल्वे फाटक बसवावे, शहरात रेल्वेस्थानकात परिसरात भुयारी मार्ग बांधावा आदी मागण्या रेल्वेमंत्र्यांकडे करण्यात आल्या.