Indian Railways News => Topic started by chotelal on Jun 17, 2013 - 06:01:49 AM


Title - महिला टीसीचा असाही उद्दामपणा
Posted by : chotelal on Jun 17, 2013 - 06:01:49 AM

नागपूर
विनातिकीट प्रवास करणाऱ्या एका महिलेला महिला ​ टीसीने मारहाण केल्याची घटना गुरुवारी सकाळी मुख्य रेल्वेस्थानकावर घडली . मात्र , या प्रकाराची अद्याप पोलिसांत तक्रार नाही .

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार , दक्षिण एक्स्प्रेसने एक महिला आपल्या दोन मुलांसह प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर उतरली . महिला टीसीने तिला तिकिटाबद्दल विचारले . मात्र , तिच्याकडे तिकीट नव्हते . आपल्याला नागपूरला अंत्यसंस्कारासाठी यायचे होते व त्या घाईत तिकीट काढले नाही , असे त्या महिलेचे म्हणणे होते . यावेळी टीसीने तिच्याकडून १ हजार रुपयांचा दंड वसूल केला . मात्र , त्यावेळी दोघींमध्ये वाद झाला आणि टीसीने त्या महिलेच्या श्रीमुखात भडकवून दिली . त्यामुळे प्रवासी महिला रडायला लागली . विनातिकीट प्रवास केला म्हणून दंड वसूल केल्यावर मारले कशाला , असा तिचा सवाल होता . काही प्रवाशांनी त्या महिलेला पोलिसांत तक्रार देण्यास सांगितले . मात्र , अंत्यसंस्काराला जायचे असल्याने ती तशीच निघून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले .
-----
मारण्याचा काय अधिकार ?
नियमानुसार टीसींना प्रवाशांना मारण्याचा अधिकार नाही . विनातिकीट प्रवासी ऐकत नसल्यास त्याला टीसी पोलिसांकडे घेऊन जाऊ शकतात . मात्र , गुरुवारच्या या मारहाणीच्या घटनेमुळे टीसींचा उद्दामपणा समोर आला आहे . या घटनेमुळे रेल्वे स्थानकावर काही काळ तणाव पसरला होता .