Indian Railways News => Topic started by Mafia on Jul 20, 2013 - 23:59:44 PM


Title - मरेचा वेग वाढणार
Posted by : Mafia on Jul 20, 2013 - 23:59:44 PM

मुंबई - डायरेक्ट करंट (डी. सी. ) वीज प्रणालीवर चालणा-या जुन्या लोकलचे पूर्णपणे अल्टरनेट करंट (ए. सी.) प्रणालीवर चालणा-या लोकलमध्ये रूपांतर करण्यात मध्य रेल्वेच्या अभियंत्यांना यश आले आहे. ‘डीसी’मधून ‘एसी’मध्ये रूपांतरीत झालेली पहिली लोकल मध्य रेल्वेने बनवली आहे. या लोकलमुळे मध्य रेल्वेचा प्रवास आणखी वेगवान होणार असून विजेचीही बचत होणार आहे. सानपाडा कारशेडमध्ये ही गाडी ठेवण्यात आली आहे. ही लोकल लवकरच लोणावळा सेक्शनमध्ये धावणार आहे. या लोकलच्या कामासाठी केवळ ३ कोटी ५ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. नवीन एसी प्रणालीची लोकल तयार करायची म्हटल्यास त्यासाठी सुमारे २४ कोटींचा खर्च येतो. मात्र, केवळ तीन कोटींत ही लोकल तयार करून मध्य रेल्वेने २१ कोटी रुपये वाचवले आहेत. याच यंत्रणेच्या आणखी १५ लोकल मध्य रेल्वे तयार करणार आहे. पश्चिम रेल्वेमार्गावरील ‘डीसी’ ते ‘एसी’ वीज परावर्तनाचे काम पूर्ण झाले आहे. पश्चिम रेल्वेवर सर्व गाडय़ा या ‘एसी’ प्रणालीवर चालणा-या आहेत. मध्य रेल्वेवरही सध्या ‘डीसी’ ते ‘एसी’ विद्युत परावर्तनाचे काम सुरू आहे. त्यामुळे भविष्यात मध्य रेल्वेवरीलही सर्व लोकल या ‘एसी’ प्रणालीवरच चालाव्यात यासाठी मध्य रेल्वेने एसी प्रणालीवर चालणा-या लोकलची निर्मिती करण्याचे काम हाती घेतले आहे. १५ पैकी ११ लोकल ठाणे-कर्जत-कसा-यासाठी पहिली ‘एसी’ लोकल सानपाडा कारशेडमध्ये बनवण्यात आली आहे. ही पहिली लोकल सुरुवातीच्या काळात लोणावळा विभागात म्हणजेच पुणे-लोणावळादरम्यान धावणार आहे. याच पद्धतीने आणखीन १५ एसी लोकल मध्य रेल्वेच्या वतीनेसानपाडा कारशेडमध्येच तयार केल्या जात आहेत. यातील चार लोकल या लोणावळा विभागासाठी सुरुवातीला दिल्या जातील तर ११ लोकल या ठाणे ते कर्जत कसारा मार्गावर चालवल्या जाणार आहेत. सध्या कल्याण ते ठाणे दरम्यान ‘डीसी’ ते ‘एसी’ परावर्तनाचे काम जोरात सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर या लोकलचा वापर करण्यात येईल. यामुळे प्रवास तर जलद होईलच पण विजेचीही बचत होणार आहे.