Indian Railways News => Topic started by AllIsWell on Jul 08, 2013 - 18:00:36 PM


Title - मध्य रेल्वेचा गोंधळात गोंधळ
Posted by : AllIsWell on Jul 08, 2013 - 18:00:36 PM

बुधवारी सकाळी नऊ वाजता ठाणे-वाशी ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि ऐरोलीदरम्यान रुळाला तडा गेला आणि वाहतूक तब्बल एक तास ठप्प झाली. तर सकाळी साडेअकराच्या सुमारास दादरजवळ एका गाडीत तांत्रिक बिघाड झाला आणि कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाडय़ा खोळंबल्या. परिणामी मध्य रेल्वेची वाहतूक नेहमीप्रमाणे कोलमडली.
मध्य रेल्वेमार्गावर सध्या गोंधळाशिवाय एकही दिवस जात नाही. परिणामी प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. मात्र दर रविवारी नेमाने मेगाब्लॉकच्या नावाखाली अभियांत्रिकी काम, किंवा मध्येच कधीतरी विशेष ब्लॉक घेऊन कामे काढणाऱ्या मध्य रेल्वेला प्रवाशांच्या हालांची काही पर्वाच नसल्याचे चित्र समोर आले आहे.
ठाणे स्थानकातील ट्रान्सहार्बरच्या प्लॅटफॉर्म ९ आणि १० येथे प्रवाशांची एकच गर्दी जमली होती. त्यातच प्रथम वर्गाच्या डब्यांजवळच्या भागात छप्पर नसल्याने प्रवाशांना भिजत उभे राहावे लागले. रेल्वेतर्फे उद्घोषणा करून माहिती देण्यात आली. 'ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहील,' ही उद्घोषणा ऐकून अनेक प्रवाशांनी स्थानकाबाहेरचा रस्ता धरला आणि सिडको येथील 'एनएनएमटी'च्या बसचा आसरा घेतला. मात्र सेवा पुन्हा लवकरच सुरू होत आहे, अशा प्रकारची कोणतीही उद्घोषणा रेल्वेने केली नाही, असे काही प्रवाशांनी सांगितले. तब्बल ४० मिनिटे चाललेल्या या गोंधळात ट्रान्स हार्बर मार्गावरील आठ फेऱ्या रद्द झाल्या.
हा गोंधळ मार्गी लागत नाही तोच साडेअकराच्या सुमारास दादरजवळ टिटवाळ्याकडे जाणाऱ्या एका लोकल गाडीत तांत्रिक बिघाड झाला आणि ती जागीच बंद पडली. त्यामुळे तिच्या मागच्या कल्याण, अंबरनाथ आदी गाडय़ा खोळंबल्या. हा बिघाड तात्पुरता दुरुस्त होण्यास दहा ते पंधरा मिनिटांचा कालावधी लागला. या दरम्यान कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद पडली. परिणामी घाटकोपर, कुर्ला, ठाणे या स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी गोळा झाली. अखेर ही गाडी कुर्ला कारशेडमध्ये दुरुस्तीसाठी नेण्यात आल्यावर वाहतूक पूर्ववत झाली. या घटनेमुळे मध्य रेल्वेची अप आणि डाऊन वाहतूक अर्धा ते पाऊण तास उशिराने सुरू होती.