Indian Railways News => Topic started by railgenie on Sep 02, 2013 - 20:57:07 PM


Title - पुणे रेल्वे स्थानकालगत नवीन वाहनतळ | सकाळ
Posted by : railgenie on Sep 02, 2013 - 20:57:07 PM

पुणे - पुणे रेल्वे स्थानकालगत सुमारे सहा हजार चौरस मीटरचा वाहनतळ साकारला असून येत्या पंधरा दिवसांत तो प्रवाशांच्या वाहनांसाठी 24 तास उपलब्ध होणार आहे.

पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात व लगत सध्या दोन वाहनतळ आहेत; परंतु त्यांचा आकार लहान आहे. ते सदैव भरलेले असतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. शिवाय दोन्ही वाहनतळांच्या दर आकारणीबाबतही प्रवाशांच्या तक्रारी आहेत. या पार्श्‍वभूमीवर मालधक्का चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे रुग्णालयाजवळ नवा वाहनतळ उभारण्यात येत आहे. सुमारे सहा हजार चौरस मीटरचा तो आहे. एसटी स्थानकाजवळूनही प्रवाशांना तेथे जाता येईल. त्या वाहनतळाचे कंत्राट देण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्या नुसार एका ठेकेदाराला तो चालविण्यासाठी देण्यात आला आहे. वाहनतळाच्या भूखंडाचे सध्या सपाटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. वीज व छोटे कार्यालय उभारण्याचे काम सुरू असून, येत्या पंधरा दिवसांत वाहनतळ प्रवाशांसाठी उपलब्ध होईल, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दुचाकी वाहनांसाठी दोन रुपये प्रतितास शुल्क असेल. 18 तासांहून अधिक वेळेसाठी वेगळा दर आकारण्यात येणार आहे, तर चार चाकी वाहनांसाठी चार तासांसाठी दहा रुपये शुल्क असेल. शुल्काची माहिती प्रवाशांना व्हावी, या साठी संबंधित कंत्राटदाराला दोन पाट्या लावण्याचा आदेश रेल्वे प्रशासनाने दिला आहे. या वाहनतळावर तसेच रेल्वे स्थानकाच्या आवारातील व लगतच्या वाहनतळावर ठरवून दिलेल्या दरापेक्षा प्रवाशांकडून अधिक शुल्क आकारल्यास प्रवाशांनी लेखी तक्रार विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात करावी, त्यानुसार संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

स्थानकातील वाहतूक योजनेत बदल होणार
पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात वाहनतळामुळे तसेच प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्या वाहनांमुळे वारंवार वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र आहे. त्यातच पोलिस व लष्कराशी संबंधित वाहनेही बेशिस्तपणे उभी राहत आहेत. या पार्श्‍वभूमीवर स्थानकातील वाहतूक व्यवस्थेचा चेहरामोहराच बदलेल असा आराखडा मध्य रेल्वे प्रशासन सध्या करीत आहे. लवकरच त्याची अंमलबजावणी होणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळील रस्त्यावर थांबणाऱ्या बेशिस्त वाहनांमुळे परिसरात कोंडी होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी वाहतूक पोलिसांकडे करण्यात आल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.