Indian Railways News => Topic started by ConfirmTicket on May 24, 2012 - 00:00:20 AM


Title - पावसाळी आव्हानांसाठी कोकण रेल्वे सज्ज
Posted by : ConfirmTicket on May 24, 2012 - 00:00:20 AM

कणकवली : पावसाळ्यात दरडी कोसळणे, रुळांवर पाणी येणे आदी अनुचित घटना घडू नयेत यासाठी कोकण रेल्वेने पावसाळीपूर्व कामे पूर्ण केली असून मॉन्सूनसाठी पूर्णत: सज्जता ठेवली आहे. या कामांसाठी सुमारे दहा कोटी रुपये खर्च प्रशासनाने केला आहे. यात सर्वाधिक खर्च पोमेंडी भागात करण्यात आला असून यंदा रेल्वे मार्ग सुरक्षित असेल, असा दावा कोकण रेल्वेने केला आहे.

अतिवृष्टी कालावधीत कोकण रेल्वेचा मार्ग दरवर्षी दहा-पंधरा दिवस बंद राहतो. यात लांब पल्ल्याच्या फेऱ्या अन्य मार्गावरून वळवाव्या लागतात, तर मडगाव-मुंबईपर्यंतच्या फेऱ्या रद्द कराव्या लागतात. यात कोट्यवधीचे नुकसान रेल्वेला सहन करावे लागते. यंदा तशी परिस्थिती येऊ नये यासाठी कोकण रेल्वेने जानेवारीपासून विविध उपाययोजना हाती घेतल्याची माहिती कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक जॉर्ज जोसेफ यांनी दिली.

कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात दरडी कोसळणे, मार्ग खचणे आदी समस्या प्रामुख्याने उद्‌भवतात. यात गेली पाच वर्षे निवसर आणि त्या पाठोपाठ पोमेंडी येथील मार्ग रेल्वेची डोकेदुखी बनला होता. गतवर्षी सिंधुदुर्गातील तळवडे येथील दरड कोसळल्याने दोन दिवस मार्ग ठप्प होता. या पार्श्‍वभूमीवर पर्यायी मार्ग काढून निवसरचा धोका दूर करण्यात आला, तर पोमेंडी ट्रॅकलगतचा डोंगरच कापून डोंगर खचण्याचा धोका दूर करण्यात आला. याखेरीज सिंधुदुर्गातील तळवडे, रत्नागिरीतील दिवाणखावटी, सावर्डे तसेच असुर्डे, कडवई, बेर्डेवाडी, काळंबा, सुखवली, कोंडवी येथील डोंगर कापून माती काढण्यात आली आहे; तर इतर ठिकाणच्या कमी उंचीच्या दरडी कापून तेथे पायऱ्या करून माती रुळावर येणार नाही याची दक्षता घेण्यात आली. या उपायांमुळे यंदा कोकण रेल्वे मार्ग निर्धोक असेल असा विश्‍वास रेल्वे प्रशासनाने व्यक्‍त केला आहे.

कोकण रेल्वे प्रशासनाने सन 2005 पासून सर्व बोगदे आणि दगडी भिंती सिमेंट कॉंक्रिटने भक्‍कम केल्या होत्या; मात्र गेल्या पाच वर्षांत यातील अनेक ठिकाणचे सिमेंट निघाले होते. यंदा तेथे नव्याने सिमेंटची फवारणी करण्यात आली. यात बेर्डेवाडी, करबुडे, परचुरी, धामणदेवी आणि नातूवाडी येथील बोगद्यांचा समावेश आहे. तसेच डोंगरावरील माती झऱ्यांबरोबर रुळावर येणार नाही, यासाठी विशेष उपायययोजना आणि रॉकबोल्डींची कामेही नव्याने हाती घेण्यात आल्याची माहिती श्री. जॉर्ज यांनी दिली.

पावसाळ्यातील अतिवृष्टी कालावधीत धोका अधिक वाढतो. यामुळे धोकादायक ठिकाणी चोवीस तास वॉचमन ठेवले जातात. यंदा अशा डेंजर स्पॉटची पाहणी सुरू आहे. एक जूनपर्यंत पाहणी पूर्ण होईल. त्यानंतर संवेदनशील ठिकाणी चोवीस तास नजर ठेवली जाणार आहे. तसेच रेल्वे मार्गाची देखरेख ठेवण्यासाठी तीनशे जणांचे पेट्रोलिंग पथक तयार करण्यात येणार आहे. अतिवृष्टी कालावधीत ट्रेनचालकांना चाळीस किलोमीटर वेगाने गाडी चालविण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. पावसाळ्यातील दक्षता म्हणून यंदाही दहा जूनपासून वीर ते उडपी या 645 किलोमिटरवरील वेगमर्यादा 70 ठेवली जाणार आहे. तसेच पावसाळी वेळापत्रक कार्यान्वित राहणार आहे