Indian Railways News => Topic started by nikhilndls on Jul 21, 2013 - 15:00:58 PM


Title - पावसाचा रेल्वेला तडाखा
Posted by : nikhilndls on Jul 21, 2013 - 15:00:58 PM

४0 तासांचा ब्लॉक : अतवृष्टीमुळे वाहतूक विस्कळीत,१0 गाड्या रद्द
नागपूर : मध्य रेल्वेच्या वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वेस्थानकापासून एक कि.मी. अंतरावर रूळाखालील माती व गिट्टी वाहून गेल्याने काल (दि.१९) रात्रीपासून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. (दि.२0) रेल्वे रूळाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी वाहतूक सुरळीत होण्याकरिता ४0 तास लागतील, असा अंदाज रेल्वेच्या सूत्रांनी व्यक्त केला. दरम्यान, नागपूरहून सुटणार्‍या १0 गाड्या आज रद्द करण्यात आल्या असून ७४ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
काल सायंकाळी झालेल्या अतवृष्टीने वर्धा ते नागपूर रेल्वे मार्गावरील पिपरा गावाजवळ बोर नदीच्या पुरामुळे ३00 ते ४00 मीटर अंतरावरील अप-डाऊन रूळाखालील गिट्टी, माती वाहून गेली. यामुळे रेल्वेची प्रवासी व माल वाहतूक ठप्प झाली आहे. रुळाखाली १0 फूट खड्डे पडले आहेत. घटनेची माहिती मिळताच ‘डीआरएम’ दीक्षित अधिकार्‍यांसह घटनास्थळी पोहोचले. ३00 कामगारांनी युद्धस्तरावर काम सुरू केले. २४ रेल्वेगाड्या इटारसी, खंडवा, भुसावळमार्गे वळविण्यात आल्या. रात्री ८ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली व रेल्वे प्रशासनाच्या पायाखालची वाळूही सरकली. वेळीच माहिती मिळाल्याने दुर्घटना टळली. रेल्वेच्या दोन विशेष गाड्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनात नागपूरहून तंत्रज्ञ, माती, खडी, गिट्टी व स्लीपर्स घेऊन घटनास्थळी दाखल झाल्या. नागपूरहून निघालेली हावडा-अहमदाबाद ही गाडी सिंदी बोरखेडी रेल्वे स्थानकादरम्यान थांबविण्यात आली होती. अन्य चार रेल्वेगाड्या जागोजागी खोळंबल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. दुरुस्ती कामात भुसावळ, बल्लारशाह, नागपूर येथील रेल्वेची यंत्रणा कामाला लागल्याचे रेल्वे सुत्रांनी सांगितले. ४0 तासांचा ब्लॉक असला तरी रेल्वेची वाहतूक सुरळीत होण्याकरिता किमान तीन दिवस लागण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. मध्य रेल्वेसह दक्षिण रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाली आहे. यामुळे हजारो प्रवाशांना बडनेरा, वर्धा, नागपूर व अन्य लहान-मोठय़ा स्थानकांवर ताटकळावे लागत आहे.
दरम्यान अमरावती जिल्ह्यात आज सायंकाळी सात वाजता खंडवा ते अकोला नॅरोगेज पॅसेंजरच्या इंजिनवर धारणीनजिक धूळघाट ते तलाई गावादरम्यान दरड कोसळली. या गाडीतून सुमारे ६00 प्रवाशी प्रवास करीत होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
नरखेड रेल्वे मार्गावर चार गाड्या
=कालपासून बडनेरा ते नागपूर दरम्यान जाणार्‍या रेल्वेगाड्या नरखेड मार्गाने सोडण्यात आल्या. आज कोल्हापूर-गोंदिया (महाराष्ट्र एक्स्प्रेस), अहमदाबाद-चैन्नई, मुंबई-हावडा (गीतांजली) व नागपूर-अहमदाबाद (प्रेरणा एक्स्प्रेस) या चार गाड्या नरखेड मार्गे सोडण्यात आल्या. अमरावती-जबलपूर एक्स्प्रेस, भुसावळ-नागपूर व भुसावळ-वर्धा पॅसेंजर रद्द करण्यात आली. रात्रीच्या वेळेस धावणार्‍या गाड्यासुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्या रद्द तर काहींचे मार्ग बदलविण्यात आले. नरखेड मार्गे नागपूर तर इटारसी-भुसावळ मार्गे काही रेल्वे गाड्या सोडल्या जात आहेत.
अमरावती-मुंबई
एक्स्प्रेसवर तोबा गर्दी
मुंबईकडे जाणारी गोंदिया-मुंबई, हावडा-मुंबई शालिमार एक्स्प्रेस, हावडा-मुंबई (गीतांजली एक्स्प्रेस) या गाड्या वर्धा, बडनेरा मार्गे धावल्या नाहीत. त्यामुळे मुंबईला जाणार्‍या प्रवाशांनी आज अमरावती-मुंबई एक्स्प्रेसवर एकच गर्दी केली. ‘नो रुम’ आरक्षण खिडक्यावर कायम होते. वर्धा, पुलगाव, धामणगाव व चांदूररेल्वे येथील अनेक प्रवाशांनी अमरावती प्लॅटफार्मवर मुंबईकडे जाण्यासाठी गर्दी केली होती. ही गाडी ‘हाऊसफुल्ल’ धावली.