Indian Railways News => Topic started by nikhilndls on May 15, 2012 - 06:00:56 AM


Title - परळ टर्मिनससाठी आणखी पाच वर्षे थांबा
Posted by : nikhilndls on May 15, 2012 - 06:00:56 AM

मुंबई : मुंबईकडे येणाऱ्या बहुतांश लोकल दादर स्थानकातच रिकाम्या होतात. त्यामुळे या सर्व लोकल छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत न चालवता भविष्यात त्या परळ येथून सोडण्याची मध्य रेल्वेची योजना आहे. मात्र कुर्ला-सीएसटीदरम्यान पाचवा आणि सहावा मार्ग तयार झाल्याशिवाय या योजनेची अंमलबजावणी करणे शक्‍य नाही आणि या मार्गात भूसंपादन हीच मुख्य अडचण आहे. त्यामुळे हा मार्ग तयार होण्यास किमान पाच ते सहा वर्षे लागतील. त्यामुळे परळ टर्मिनसचे कामही तोवर पूर्ण होऊ शकणार नाही, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

खोपोली, कर्जत, कसारा, कल्याण येथून मुंबईकडे खचाखच भरून येणाऱ्या लोकल दादर आणि परळ स्थानकांतच 70 टक्के रिकाम्या होतात. दादर हे प्रवासाच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण असल्याने लाखो प्रवासी या स्थानकातून ये-जा करतात. परळ आणि आजूबाजूच्या परिसरात खासगी कंपन्या, कार्पोरेट कार्यालयांचे जाळे, रुग्णालये असल्याने तेथील प्रवासी दिवसागणिक वाढत आहेत. परळच्या पुढील स्थानकांत सीएसटीपर्यंत तुलनेने 30 टक्के प्रवासीच गाड्यांत असल्याचे रेल्वेच्या पाहणीत आढळून आले. सीएसटीप्रमाणेच दादर स्थानकातील भार कमी करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी भविष्यात परळ स्थानकात एक अतिरिक्त फलाट तयार करून आणि सध्याच्या फलाटांवर दोन्ही बाजूंनी चढण्या-उतरण्याची सोय करून तेथून धीम्या गाड्यांची वाहतूक सुरू करण्याचा आराखडा रेल्वेने तयार केला आहे. ज्याप्रमाणे दादर स्थानक मध्य आणि पश्‍चिम रेल्वेला जोडले गेले आहे; त्याप्रमाणेच परळ आणि एल्फिन्स्टन रोड स्थानकही जोडले गेले आहे. त्यामुळे दोन्ही रेल्वेला जोडणारे स्थानक म्हणून परळ स्थानक विकसित केल्यास, तेथेही जलद गाड्यांना थांबा दिल्यास प्रवाशांचा वेळ आणि हाल वाचतील. मात्र परळ स्थानकात जलद गाड्या थांबण्याची सोय असली; तरी एल्फिन्स्टन रोडला तशी सोय नसल्याने प्रवासी परळला न उतरता दादरला उतरण्याचा पर्याय स्वीकारतात. त्यावर तूर्त तोडगा नसला, तरी परळ परिसरातील सध्याच्या आणि भविष्यात वाढणाऱ्या गर्दीचा विचार करून परळ स्थानकाच्या विस्ताराची योजना आखण्यात आली आहे.

मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पाच्या (एमयुटीपी) दुसऱ्या टप्प्यांतर्गत ठाणे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) दरम्यान पाचवा आणि सहावा मार्ग तयार करण्यात येणार आहे. पण "एमयुटीपी'चा पहिला टप्पा पूर्ण होण्यास 16 वर्षांचा काळ गेला. "एमयुटीपी'च्या दुसऱ्या टप्प्यातील कामांचा आता कुठे श्रीगणेशा झाला आहे. ठाणे ते विद्याविहारदरम्यान दोन जादा मार्ग टाकण्याचे काम पूर्ण झाले. पण विद्याविहार ते सीएसटीदरम्यान अतिरिक्त मार्ग टाकण्यासाठीची जमीन संपादित झालेली नाही. कुर्ला, करी रोड, चिंचपोकळी, मस्जिद आदी स्थानकांदरम्यान जमीन संपादन करण्याच्या कामात रेल्वेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जवळपास तीन हजार प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न बाकी आहे. ही अग्निदिव्ये पार करण्यातच चार ते पाच वर्षांचा काळ जाण्याची शक्‍यता आहे, असे रेल्वेतील अधिकाऱ्यांचेच म्हणणे आहे. सीएसटीपर्यंतचा पाचवा-सहावा मार्ग अस्तित्वात आल्यानंतर लांब पल्ल्याच्या मेल एक्‍स्प्रेस, मालगाड्या आणि धीम्या-जलद मार्गावरील वाहतूक वेगळी करता येईल. त्या वेळी परळ स्थानकातून लोकल सोडण्यासाठीही जागा निर्माण होईल, असे रेल्वेचे नियोजन आहे.

------------------------------------------------------------ "दादर, परळ स्थानकापासून पुढे सीएसटीपर्यंत प्रवास करणाऱ्यांची संख्या 30 टक्के असल्यामुळे परळ स्थानकात एक अतिरिक्त फलाट तयार करून येथूनच काही लोकल सोडण्याची मध्य रेल्वेची योजना आहे. ठाणे-सीएसटी दरम्यान पाचवा आणि सहावा मार्ग तयार झाल्यानंतरच या योजनेची अंमलबजावणी करता येईल.''

- विद्याधर मालेगावकर (मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे)