Indian Railways News => Topic started by RailXpert on Jul 22, 2013 - 03:00:03 AM


Title - नागपूरच्या प्रवाशांचा खोळंबा
Posted by : RailXpert on Jul 22, 2013 - 03:00:03 AM

मुंबई

विदर्भातील मुसळधार पावसामुळे शनिवारी नागपूरहून मुंबईकडे येणाऱ्या , तसेच मुंबईहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या एकेक रेल्वे गाड्या रद्द झाल्या . त्यामुळे मुंबईहून नागपूरकडे निघालेल्या प्रवाशांचा खोळंबा झाला . रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने काही प्रवाशांनी खासगी बसेस तसेच विमानतळाकडे धाव घेतली . मात्र , सगळ्यांनाच ते शक्य नसल्याने बहुतांश प्रवाशांनी ' आमची सारी भिस्त रेल्वेवरच ' असे म्हणत सीएसटी स्टेशनमध्येच तंबू ठोकले .

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या विदर्भातील मुसळधार पावसाचा जोरदार फटका शनिवारी रेल्वे सेवेला बसला . मुंबई - नागपूर दुरांतो एक्सप्रेस , नागपूर - मुंबई दुरांतो एक्सप्रेस , मुंबई - नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस , नागपूर - मुंबई सेवाग्राम , नागपूर - पुणे एक्सप्रेस , मुंबई - नागपूर नंदीग्राम आणि पुणे - नागपूर गरीबरथ एक्सप्रेस या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्याने हजारो प्रवाशांची गैरसोय झाली .

जयेंद्र शहा व त्यांचा मेहुणा बिपिन यांनीही नंदीग्रामचे तिकीट काढले होते . मात्र , गाडी रद्द झाल्यामुळे संध्याकाळच्या विदर्भ एक्सप्रेसबाबत काय घोषणा होते याची ते वाट पाहत होते . सेवाग्राम एक्सप्रेसचे तिकीट काढलेल्या कविता भुरकुटे यांना शनिवारी दुपारीच दादर स्थानकावर गाडी रद्द झाल्याची सूचना मिळाली होती . मात्र , पुढील हालचाली काय असतील हे जाणून घेण्यासाठी त्या स्टेशनवर आल्या होत्या .

नागपूरपर्यंतचा प्रवास बसने शक्य नसल्याने आणि विमानासाठी धावपळ करणे जमणार नसल्याने आमची सारी भिस्त रेल्वेवरच आहे , असे ज्येष्ठ नागरिक वसंत पुजारे सांगत होते . ते पत्नीसह नंदीग्रामने नागपूरकडे निघाले होते .