Indian Railways News => Topic started by AllIsWell on Jul 23, 2013 - 18:00:35 PM


Title - डाऊन मार्ग रूळावर
Posted by : AllIsWell on Jul 23, 2013 - 18:00:35 PM

अपमार्ग उद्यापासून : एकाच मार्गाने दुतर्फा सेवा
वर्धा : सिंदी (रेल्वे)जवळ महावृष्टीने रेल्वे रुळाखालील माती व गिट्टी वाहून गेल्यामुळे विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची सेवा डाऊन मार्ग सुरळीत झाल्याने आज सकाळपासून रुळावर आली आहे.
या एकाच मार्गावरून दुतर्फा वाहतुक सकाळी साडेनऊ वाजतापासून सुरू झाल्याने रेल्वे प्रशासनाने काही प्रमाणात सुटकेचा श्‍वास घेतला. दुसर्‍या अप मार्गाचे कामही युद्ध पातळीवर सुरू आहे. हा मार्ग देखील एक-दोन दिवसात सुरळीत सुरू होणार असल्याचे संकेत रेल्वे प्रशासनाने दिले आहे. रेल्वेसेवा पूर्ववत रुळावर आणण्यासाठी पाच पोकलॅन्ड मशीनच्या आधाराने ५00 मजूर दिवसरात्र एक करून युद्ध पातळीवर कामाला लागले आहे. रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक ब्रिजेश दीक्षितसुद्धा येथे तळ ठोकून आहे. अशातच आज सकाळी ९.३0 वाजता डाऊन मार्गाच्या रुळाखाली सिमेंटचे सिलीपाट टाकून हा मार्ग पुर्ववत करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले.
या मार्गावरूनच अप-डाऊन मार्गाने ये-जा करणार्‍या गाड्या सोडण्यात येत आहे. सर्वप्रथम दोन मालगाड्या काढून हा मार्ग सुरळीत झाला वा नाही याचे निरीक्षण करण्यात आले. यानंतर हैदराबाद - निजामुद्दीन ही प्रवासी रेल्वे गाडी या ठिकाणाहून काढण्यात आली. यानंतर या मार्गानेच दक्षिण भारत व मुंबई-हावडा मार्गाच्या गाड्या सुरू करण्यात आल्या.
आज सकाळची नंदीग्राम एक्स्प्रेस वगळता सर्व रेल्वे गाड्या या मार्गाने सोडण्यात आल्या.
१९ जुलैला दुपारनंतर सेलू तालुक्यात महावृष्टी झाली. या पावसाने बोर नदीला पूर आला. पुराचा प्रवाह प्रचंड वेगाने असल्यामुळे रात्री ८ वाजताच्या सुमारास सिंदी रेल्वे स्थानकापासून पश्‍चिमेस एक कि.मी. अंतरावर रेल्वे रुळाखालील माती व गिट्टी वाहून गेली.
तसेच या आपत्तीत रेल्वेचा एक वीज खांब मुळासकट उपटल्या गेला, तर अन्य तीन खांब झुकले. यामुळे एकाएकी मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली होती. यामुळे तिकिट आरक्षण करून ठेवलेल्या व इतर रेल्वे प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागला. इतकेच नव्हे, तर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना तिकिटाची रक्कम देखील परत केली. (जिल्हा प्रतिनिधी)