Indian Railways News => Topic started by railenquiry on Jul 03, 2013 - 03:08:51 AM


Title - गैरसोय: रेल्वेच्या नवीन वेळापत्रकाने प्रवाशांची उडवली झोप
Posted by : railenquiry on Jul 03, 2013 - 03:08:51 AM

औरंगाबाद-  दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या वतीने नगरसोल- नांदेड (57541) या चाकरमान्यांसाठी सोयीच्या असलेल्या पॅसेंजर रेल्वेची वेळ बदलल्याने औरंगाबादहून जालना आणि परभणीकडे जाणार्‍या चार हजारांवर प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. सकाळी नऊ वाजता औरंगाबादहून निघणारी रेल्वेगाडी आता 7.15 वाजता निघेल. नवीन वेळापत्रक सर्वांसाठी गैरसोयीचे व त्रासदायक असल्याने प्रवाशांनी विरोध दर्शवला आहे.

अशी आहे प्रवासी संख्या : दहा डब्यांच्या रेल्वेत तारूर येथून 20 प्रवासी बसतात. रोटेगाव 1200, परसोडा 300, करंजगाव 200, लासूर 1300, पोटूळ 100, दौलताबाद 25 असे प्रवासी बसतात. यातील 80 टक्के प्रवासी औरंगाबादला उतरतात व दोन हजार प्रवासी जालन्यासाठी बसतात. मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावरून एक हजार प्रवासी बसतात.

परतीचा प्रवास असा सकाळी नगरसोल-नांदेड पॅसेंजरने जाणारे प्रवासी सायंकाळी काचीगुडा-मनमाड एक्स्प्रेसने औरंगाबादला परत येतात. जालना येथून उपरोक्त रेल्वे सायंकाळी 5.30 वाजता निघून औरंगाबादला 6.30 वाजता येते. आता नवीन वेळापत्रकानुसार ही रेल्वे जालन्याहून सायंकाळी 5.50 वाजता निघून औरंगाबादला 7.15 वाजता पोहोचेल.

नवीन वेळापत्रक नगरसोलहून नवीन वेळापत्रकानुसार पॅसेंजर सकाळी 5.20 वाजता निघणार आहे. औरंगाबादला रेल्वे सकाळी 7 वाजता येईल. जालन्याला 8.30 वाजता पोहोचणार असल्याने एवढय़ा लवकर चाकरमान्यांसह इतर कर्मचार्‍यांनी जालना अथवा पुढच्या स्थानकांवर जाऊन काय करावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

पूर्वीचे वेळापत्रक नगरसोल-नांदेड पॅसेंजर ही औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील प्रवाशांसाठी उपयुक्त अशी रेल्वे आहे. दररोज नोकरी, शिक्षण, व्यवसाय करणारे आणि कामगारांसाठी ही रेल्वे वरदान ठरलेली आहे. सकाळी 7.30 वाजता नगरसोल येथून निघून औरंगाबादला 9 वाजता पोहोचते. औरंगाबादहून 9.10 वाजता निघालेली पॅसेंजर जालना येथे 10.30 वाजता पोहोचते.

आंदोलनाचा इशारा

> नगरसोल-नांदेड पॅसेंजरची वेळ पूर्वीप्रमाणेच ठेवण्याची मागणी सर्व थरांतून केली जात आहे. उपरोक्त वेळापत्रकामुळे प्रवाशांचे नियोजन कोलमडणार असून, प्रवाशांची गैरसोय होणार. -राजकुमार सोमाणी

>औरंगाबादहून सकाळी 7 वाजता रेल्वे सुटत असल्याने जालना येथे 8.30 वाजता पोहोचणार. सर्व कार्यालये 10.30 नंतरच उघडतात. त्यामुळे दोन तास आधी जाऊन काय करणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. -नासेर शेख, कामगार.

>जाताना दोन तास आधी जावे व येताना तासभर उशिरा यावे लागणार असल्याने शिक्षणासाठी पुन्हा बसचा महागडा पर्याय अवलंबण्याची वेळ आली आहे. -रूपेश भावसार, विद्यार्थी.