Indian Railways News => Topic started by railgenie on Aug 08, 2013 - 17:58:57 PM


Title - गुरवली स्टेशनला हिरवा कंदील
Posted by : railgenie on Aug 08, 2013 - 17:58:57 PM

कल्याण

टिटवाळा ते खडवली दरम्यान गुरवली स्टेशन निर्माण करण्याच्या दृष्टीने रेल्वेच्या वाणिज्य विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता या भागातून रेल्वेला अपेक्षित उत्पन्न मिळू शकेल, त्यामुळे येथे रेल्वे स्टेशन होण्यास हरकत नाही असा अभिप्राय त्यांनी नोंदवला आहे. त्यामुळे गुरवली स्थानकच्या निर्मितीची मागणी प्रत्यक्षात येण्याची आशा निर्माण झाली आहे.

कल्याण ते खडवली दरम्यानचे अंतर ८ किमी असून, या परिसरात ३३ गावे आणि पाडे आहेत. या भागाची लोकसंख्या १ लाख ४० हजार ८४८ इतकी असून, या नागरिकांना रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी बराच रिक्षाप्रवास करावा लागतो. रिक्षा चालकांकडून अडवणूक होत असल्यामुळे प्रवासी धोका पत्करून चालत येतात. काळू आणि उल्हास नदीच्या पुलावर पाणी भरल्यास यापैकी अनेक गावांचा संपर्क तुटतो.

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांमध्ये महाविद्यालयीन तरुण तरुणींचे प्रमाण मोठे आहे. तिसा धरण आणि टिटवाळा मंदिर परिसराकडे जाणाऱ्या भक्त आणि पर्यटकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे टिटवाळा रेल्वे स्टेशनपासून ४ किमी अंतरावरील गुरवली येथे रेल्वे स्टेशन व्हावे यासाठी स्थानिक आणि रेल्वे प्रवासी संघटना पाठपुरावा करीत आहेत. तब्बल ५७ वर्षे पाठपुरावा केल्यानंतरही रेल्वेकडून त्यांना हुलकावणीच मिळत आहे. यानंतर मागणी झालेली शेलू, नाहूर आणि कोपर स्थानके रेल्वेने प्रत्यक्षात आणली. बुधवारी रेल्वेच्या वरिष्ठ प्रबंधकाच्या आदेशानुसार वाणिज्य विभागाचे अधिकारी भानुदास तपस्वी यांनी गुरवली येथील गेट नं. ३ च्या जागेची पाहणी केली.

नव्या रेल्वे स्थानकातून दरमहा ६० हजार ते १ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळू शकेल असा अहवाल वाणिज्य विभागाकडून मिळाल्यानंतरच रेल्वे प्रशासनाकडून नव्या रेल्वे स्थानकास परवानगी दिली जाते. आजूबाजूच्या परिसरातील नागरी वस्ती पाहता आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहता याठिकाणी रेल्वे स्टेशन झाल्यास रेल्वेला अपेक्षित उत्पन्न मिळू शकेल. यामुळे या स्थानकास परवानगी देण्यास हरकत नसल्याचे तपस्वी यांनी सांगितले.

मात्र आता रेल्वे प्रशासनाने हे स्थानक व्हावे यासाठी तातडीने कारवाई करावी अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेचे जनसंपर्क अधिकारी नंदकुमार देशमुख आणि कल्याण कसारा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी केली आहे.