Indian Railways News => Topic started by puneetmafia on Sep 17, 2013 - 11:55:46 AM


Title - गँगमनच्या सतर्कतेने रेल्वे अपघात टळला
Posted by : puneetmafia on Sep 17, 2013 - 11:55:46 AM

मुंबई-हावडा वाहतूक विस्कळीत : १५ रेल्वे गाड्या प्रभावित
अकोला/ अमरावती/ नागपूर - पारसपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नागझरी येथील पुलावरील रेल्वे रूळ रविवारी रात्री झालेल्या पावसाने खचला. मात्र रेल्वे गँगमनच्या सतर्कतेमुळे या मार्गावरून धावणार्‍या अमरावती एक्स्प्रेसचा अपघात टळला. तरीही या घटनेमुळे १५ रेल्वे गाड्यांची वाहतूक प्रभावित झाली.
नागझरी युनिट क्र. २ मधील गँगमन समाधान झांगो यांनी पूल खचल्याची बाब लक्षात येता वेळीच अमरावती एक्स्प्रेस रोखली अन् हजारो प्रवाशांचा जीव वाचला. त्यानंतर मुंबई ते हावडा रेल्वेमार्गावरील डाऊन ट्रॅकवरील वाहतूक थांबविण्यात आली होती. सुरुवातीला अप लाईनवरून वाहतुक सुरू होती. दुपारी २ वाजतानंतर दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी खुले करण्यात आली असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिली.
मुंबई-अमरावती ‘अंबा’ सुपरफास्ट एक्स्प्रेस १६ सप्टेबर रोजी सकाळी ६.१७ वाजता नागझरी रेल्वे स्थानकावरून सरळ पारसकडे रवाना झाली. दरम्यान नागझरीजवळ लहान पुलावरील रूळाखालची गिट्टी वाहून गेल्याने रू ळ कमकुवत झाल्याचे गस्त घालणार्‍या कर्मचार्‍याच्या लक्षात येताच त्यांनी ही गाडी थांबविली. अंबा एक्स्प्रेसचे चालक मोरे व गार्ड प्रवीण सखळकर यांनी रूळाची पाहणी केली. रुळावरून गाडी पुढे नेणे धोकादायक असल्याची माहिती त्यांनी पारस स्टेशन उपअधीक्षक निशाणे यांना दिली. त्यानंतर निशाणे यांनी अपट्रॅकवरून धावणारी मालगाडी थांबविण्याचा निर्णय घेतला. दोन्हीकडील वाहतूक एकाच वेळी थांबविण्यात आल्याने प्रवासी गोंधळले. अंबा एक्स्प्रेस नागझरी येथे तर हावडा मेल, प्रेरणा एक्स्प्रेस व अन्य गाड्या शेगावला थांबविण्यात आल्या होत्या. या मार्गावरील सर्व गाड्या चार तास उशीराने धावत होत्या. नागझरी येथील घटनेची माहिती पारस स्टेशन उपअधीक्षकांनी रेल्वेच्या भुसावळ येथील वरिष्ठ अधिकार्‍यांना देण्यात आल्यानंतर यंत्रणा कामाला लागली. चार तासानंतर हावडा मेल व मुंबई- अमरावती एक्स्प्रेस अपट्रॅकवरून पारस स्टेशनपर्यंत आणण्यात आली. एकाच मार्गावरून पुढे काढण्यात येत असल्याने अनेक गाड्या निर्धारित वेळेपेक्षा उशीरा धावत होत्या. डाऊन ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर करून हा मार्ग दुपारी २ वाजतानंतर खुला करण्यात आला असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. (लोकमत वृत्त सेवा)
रेल्वे वेळापत्रक कोलमडले
दुपारी २.२५ वाजता डाऊन लाईन सुरू झाली. तोवर मुंबई-हावडा मार्गावरील १५ रेल्वे गाड्या विलंबाने रेल्वे स्टेशनवर पोहोचल्या. यामध्ये १२८0९ मुंबई-हावडा मेल २.३0 तास, १२८४४ अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस ३.१५ तास, ११४५३ अहमदाबाद-नागपूर प्रेरणा एक्स्प्रेस ३ तास, १८0२९ एलटीटी-शालिमार एक्स्प्रेस ३.४५ तास आणि १२८११ एलटीटी-हटिया एक्स्प्रेस ३.३0 तास उशिरा पोहोचल्या. मुंबई -अमरावती, कुर्ला-हावडा लोकमान्य टिळक, महाराष्ट्र एक्स्प्रेस, अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस, भुसावळ -अमरावती पॅसेंजर, अमरावती-सुरत पॅसेंजर, हावडा-मुंबई गितांजली एक्स्प्रेस, नागपूर-भुसावळ पॅसेंजर, गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस या गाड्या तीन ते चार तास उशीरा धावल्या. बडनेरा येथे दहा मालगाड्या थांबविल्या होत्या.