Indian Railways News => Topic started by railenquiry on Jul 03, 2013 - 18:03:28 PM


Title - कोकण रेल्वेलाही फटका
Posted by : railenquiry on Jul 03, 2013 - 18:03:28 PM

मुसळधार पावसाने रोखला मुंबई-गोवा हायवे रत्नागिरी, सिंधुदुर्ग पट्ट्यात वाहनांच्या रांगा

म. टा. वृत्तसेवा, रत्नागिरी/कणकवली

कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संगमेश्वर आदी ठिकाणी होत असलेल्या मुसळधार पावसाने मुंबई-गोवा हायवेची वाट रोखली असून हायवेवर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत शेकडो लोक अडकून पडले होते.

सिंधुदुर्गमध्ये कुडाळजवळ पीठढवळ नदीला आलेल्या पुरामुळे मुंबई-गोवा हायवेवरील वाहतूक बंद झाली. तर, रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासून होत असलेल्या पावसामुळे हायवेवरील सावर्डे ते संगमेश्वर प​रिसरातील सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. शास्त्री नदीचेही पाणी हायवेवर आल्याने खेरशेत-आरवली दरम्यान वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे चिपळूण, संगमेश्वर परिसरात रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असून राजापूरच्या शहरी भागात जाणाऱ्या रस्त्यावर दुपारी साडेतीनच्या सुमारास दरड कोसळल्याने शहरांतर्गत वाहतुकीलाही फटका बसला होता. माखजन भाग पूर्णतः पाण्याखाली गेल्याने संगमेश्वरचा संपर्क तुटला आहे.

कोकण रेल्वेलाही फटका कोकण रेल्वेच्या आरवली-संगमेश्वरदरम्यान रुळांवर माती आल्याने नेत्रावती एक्स्प्रेस सावर्ड्याजवळ थांबवण्यात आली होती. माती काढण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत वाहतूक पूर्ववत करण्याचे कोकण रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते.