Indian Railways News => Topic started by puneetmafia on Apr 19, 2012 - 03:00:22 AM


Title - कोकण रेल्वेत भरारी पथक
Posted by : puneetmafia on Apr 19, 2012 - 03:00:22 AM

कणकवली  - कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी सुटीत वाढत्या गर्दीमुळे प्रशासनही सावध झाले आहे. विनातिकीट प्रवासी आणि बेकायदा पदार्थ विक्री करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी तिकीट तपासणीस भरारी पथक ठेवण्यात आले आहे.

कोकण रेल्वे मार्गावर सध्या प्रवाशांची गर्दी ओसंडून वाहत आहे. कोकण रेल्वे, मध्य रेल्वे, पश्‍चिम रेल्वे आणि दक्षिण रेल्वेतर्फे जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. या सर्व गाड्यांमधील आरक्षण कोटा पूर्ण झाला आहे. वेटिंग लिस्टची संख्या दोनशेच्या आसपास पोचली आहे. सर्वच गाड्यांमध्ये वेटिंग लिस्टची यादी मोठी आहे. त्यामुळे प्रवाशांना लोंबकळतच प्रवास करण्याची वेळ आली आहे. गर्दीचा फायदा घेऊन काही प्रवाशी विनातिकीट गाडीत प्रवेश करतात, तर काही जनरलची तिकिट काढून स्लीपर कोचमध्ये प्रवेश करतात. याबाबतच्या तक्रारी सातत्याने वाढत होत्या. विशेषतः दिवसा धावणाऱ्या गाड्यांमध्ये गर्दीचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे विनातिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी कोकण रेल्वेने विशेष पथक नेमले आहे. या पथकात एक तिकीट तपासणीस गणवेशात, तर उर्वरित चार रेल्वे अधिकारी साध्या वेशात कोणत्याही गाडीत प्रवेश करून तपासतात. गेल्या काही दिवसांत या भरारी पथकाने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर लगाम घालण्याचा प्रयत्न केला आहे. अतिरिक्त शुल्क आकारून रेल्वेच्या आर्थिक स्थितीत भर टाकण्याचा प्रयत्न केला आहे. भरारी पथकामुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर दंड भरण्याची वेळ येत आहे.