Indian Railways News => Topic started by railgenie on Jul 20, 2013 - 21:01:01 PM


Title - कोकण रेल्वेच्या प्रवाशांना निवारा मिळणार
Posted by : railgenie on Jul 20, 2013 - 21:01:01 PM

मुंबई- कोकण रेल्वेच्या वतीने विविध स्थानकांवर 101 प्रवासी निवारा शेड आणि बसण्यासाठी 175 बेंच बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे सध्या पाऊस, ऊन-वाऱ्यापासून प्रवाशांचे संरक्षण होणार आहे. प्रवाशांच्या सोईसाठी कोकण रेल्वेच्या वतीने 85 लाख रुपये खर्च करून, निवारा शेड व फलाटावर बाके बसविण्यात येणार आहेत.

"कोरे'च्या बहुतांश स्थानकांवरील फलाटांवर शेड नाही. त्यामुळे ऊन आणि पावसात प्रवाशांना गाडीची वाट पाहावी लागते. स्थानकांवर असलेले कौलारू निवारे अपुरे आहेत; बसायला बाके नाहीत. त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन, रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

कौलारू निवाऱ्याबरोबरच आणखी 101 नवीन निवारे रेल्वेस्थानकांत उभारण्यात येणार आहेत. हे निवारे "प्रीकोटेड जी-1 कॉरोगेटेड शीटस'ने बनविले आहेत. कौलारू निवाऱ्याच्या तुलनेत ते कमी वजनाचे, आकर्षक आणि स्वस्त आहेत. आवश्‍यकतेनुसार लांबी वाढविण्याची सोय त्यात असल्याने फलाटाच्या जास्तीत जास्त भागाचे निवाऱ्यांद्वारे कमी खर्चात रक्षण करता येते, असे कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी सांगितले. या नव्या अत्याधुनिक निवाऱ्यांमुळे प्रवाशांची चांगली सोय होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.