Indian Railways News => Topic started by puneetmafia on Jul 21, 2013 - 06:00:28 AM


Title - कसारा-नाशिक शटल हवी
Posted by : puneetmafia on Jul 21, 2013 - 06:00:28 AM

नाशिक

नाशिक - पुणे रेल्वेमार्गाचे काम लवकर सुरू करावे , कसाऱ्याहून नाशिक , मनमाडसह शिर्डी , धुळ्यासाठी  शटल सेवा सुरू करावी , या व इतर मागण्यांसाठी नाशिकचे खासदार समीर भुजबळ यांनी रेल्वेमंत्री मल्लिकार्जून खर्गे यांना साकडे घातले आहे . आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेसंदर्भातील मागण्यांसाठी खासदार भुजबळ यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली .

पुढील दोन वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांच्या रेल्वेशी संबंधित समस्यांवर तोडगा निघणे गरजेचे आहे . त्यानुसार खासदार भुजबळ यांनी खर्गे यांची भेट घेत विविध मागण्या सादर केल्या . तसेच नाशिककरांना भेडसावणाऱ्या समस्याही त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या . नाशिक व त्र्यंबकला भरणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने लाखो भक्त रेल्वेने नाशिकला येतील . त्यांना विविध सुविधा देण्यासाठी नाशिकरोड रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण करणे , स्टेशनवर स्वयंचलित जिने बसविणे गरजेचे असल्याचे भुजबळ यांनी सांगितले . कुंभमेळ्यासाठी होणारी गर्दी पाहता नाशिकरोडला चौथा प्लॅटफॉर्म तातडीने करणे गरजेचे असल्याची मागणी रेल्वेमंत्र्यांना केली . तसेच कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिकरोड रेल्वे स्टेशनजवळील ओढा स्टेशन विकसित करून त्याठिकाणी आवश्यक त्या सुविधा देण्याची मागणीही भुजबळ यांनी केली . विमातळाच्या धर्तीवर नाशिकरोड रेल्वे स्टेशनच्या आधुनिकीकरणाचा आराखडा यापूर्वीच आपण रेल्वे मंत्रालयाला सादर केल्याची माहितीही भुजबळ यांनी रेल्वेमंत्र्यांना दिली .

मुंबईकडे जाण्यासाठी दररोज हजारो नाशिककर कसाऱ्याहून लोकल पकडतात . त्यांच्या सोयीसाठी कसाऱ्याहून नाशिक , मनमाड , धुळे व शिर्डीसाठी शटल सेवा उपलब्ध करून द्यावी , अशी मागणी त्यांनी रेल्वेमंत्र्याकडे केली . तसेच कसारा रेल्वे स्टेशनबाहेरील रेल्वेच्या जागेत बस वाहतुकीसाठी स्थानक , कॅण्टीन , विश्रामगृह उभारण्याची मागणीही करण्यात आली . यावर खर्गे यांनी नाशिककरांच्या  रेल्वेविषयक विविध प्रश्नांवर लवकरच तोडगा काढू , असे आश्वासन दिल्याची माहिती भुजबळ यांनी दिली .