Indian Railways News => Topic started by nikhilndls on Jun 25, 2013 - 03:00:33 AM


Title - कल्याण स्टेशनचेही ‘कल्याण’
Posted by : nikhilndls on Jun 25, 2013 - 03:00:33 AM

कल्याण

लांबलचक जुनाट सबवे ... जागोजागी लागलेली पाण्याची गळती ... गुडघाभर तर कधी ढोपरभर साचलेले पाणी ... कचरा , दुर्गंधी , भिकारी गर्दुल्ल्यांचा त्रास ... कल्याण पूर्वेतील स्टेशन परिसराची ही स्थिती अशी आहे . यातून कल्याणकरांची सुटका व्हावी म्हणून मुंब्र्याच्या धर्तीवर सुसज्ज स्टेशनचा प्रकल्प अहवाल तयार करुन तो रेल्वेला सादर करण्याबाबत खा . आनंद परांजपे यांनी पालिका आयुक्तांना सुचवले आहे . हा प्रकल्प अहवाल सादर झाल्यानंतर कल्याण स्टेशनच्या नव्या लूकसाठी आपण पाठपुरावा करू असे आश्वासनही खा . परांजपे यांनी पालिका आयुक्तांना बुधवारी दिले . केडीएमसीने या सुशोभिकरणासाठी २०१३ - १४ च्या अर्थसंकल्पात १ कोटींची तरतूद केली आहे .

मुंबईचे उपनगरातील शेवटचे मोठे स्टेशन म्हणून कल्याणची ओळख आहे . मोठ्या संख्येने येणाऱ्या मेल आणि लोकल यांमुळे स्टेशनवर दिवसाचे २४ तास प्रवाशांची मोठी गर्दी असते . तिकीट खिडक्यांच्या नूतनीकरणाव्यतिरीक्त या स्टेशनात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत . प्रवासी वाढले मात्र स्टेशनची क्षमता तीच आहे . कल्याण पूर्वेतील प्रवाशांची स्थिती विदारक आहे . पावसाळ्याच्या दिवसांत दुर्गंधी , कचरा , चिखल , पाणी , भिकारी , गर्दुल्ले यातून चालणे म्हणजे नरकयातनाच . लोकग्रामच्या जुन्या ब्रिजवरून प्रवासी जीव मुठीत घेऊन चालतात . मुंब्रा स्टेशनच्या विकासानंतर कल्याण स्टेशनकडे लक्ष देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे स्पष्ट करत बुधवारी आनंद परांजपे यांनी केडीएमसी आयुक्त रामनाथ सोनवणे यांची भेट घेतली .
स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्टेशनच्या सुशोभिकरणासाठी प्रस्ताव दिल्यास रेल्वेने अशा प्रस्तावांना हिरवा कंदील दाखवण्याचे धोरण स्वीकारले आहे . यापूर्वी खासदारांनी केडीएमसी आयुक्तांना कल्याण स्टेशनचा सुशोभिकरण प्रस्ताव रेल्वेकडे सादर करण्याची विनंती केली होती . त्याचे पुढे काय झाले याची चौकशी आयुक्तांकडे केली असता कल्याण स्टेशनच्या परिसर सुशोभिकरणाचा प्रकल्प तयार करण्यात आला असून , पुढील दोन दिवसांत तो रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे पाठवणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले . प्रस्ताव सादर केल्यानंतर केडीएमसी अधिकारी आणि रेल्वेच्या वतीने या भागाची संयुक्तिक पाहणी करण्यात येईल . आमदार , खासदार निधी आणि रेल्वेबरोबरच केडीएमसीच्या सहकार्याने सुशोभिकरणाचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन खा . परांजपे यांनी दिले आहे .

स्कायवॉकच्या कामाबद्दल नाराजी

नागरिकांसाठी बांधल्या जाणाऱ्या स्कायवॉकने तर संथगतीचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे . त्यामुळे कल्याण पूर्वेतील प्रवाशांचे हाल होत असल्याचे सांगत आनंद परांजपे यांनी या प्रकरणी प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली .