Indian Railways News => Topic started by irmafia on Jun 24, 2013 - 21:00:33 PM


Title - इतवारी स्थानकावर मालगाडीला आग
Posted by : irmafia on Jun 24, 2013 - 21:00:33 PM

नागपूर

इतवारी स्थानकावर उभ्या असलेल्या मालगाडीच्या कोळशाच्या बोगीला आग लागल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली . अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी पोहचून ही आग आटोक्यात आणली .

कोळशाने भरलेली ही मालगाडी २१ जूनच्या मध्यरात्री विशाखापट्टणम् येथून इतवारी स्थानकावर आली होती . ही गाडी खापरखेडा येथे जाणार होती . मात्र पुढील आदेश न मिळाल्याने ती इतवारी यार्डात थांबून होती . सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आरपीएफचे हेड कॉन्स्टेबल पी . के . गजभिये यांना मालगाडीच्या एका वॅगनमधून धूर निघताना दिसला . त्यांनी लगेच याबाबत पोलिस निरीक्षक तसेच स्थानक व्यवस्थापकांना कळविले . याच यार्डात मालगाडी शेजारी टाटा पॅसेंजर उभी होती . रात्री ९ . ३० वाजता टाटा पॅसेंजर सुटल्यावर या मालगाडीवर पाण्याचा मार करू , असे प्रशासनाने ठरविले होते . पावसाचे वातावरण आणि थोड्या प्रमाणात निघणारा धूर यामुळे ही आग आधी कोणी फारशी गांभीर्याने घेतली नाही . मात्र काही वेळातच धुराचे प्रमाण वाढले . त्यामुळे तातडीने अ ​ ग्निशमन विभागाला कळविण्यात आले . कोळसा हा ज्वलनशील पदार्थ आहे . आतल्या आत घर्षण होऊन तो अनेकदा पेट घेतो . आजची आगही त्यातूनच लागली असावी असा अंदाज आहे .