Indian Railways News => Topic started by irmafia on Jul 03, 2013 - 18:05:13 PM


Title - आपल्या घराजवळ मिळू शकते रेल्वे तिकीट
Posted by : irmafia on Jul 03, 2013 - 18:05:13 PM

नागपूर

रेल्वे प्रशासनाच्या जनसाधारण तिकीट बुकिंग सेवक योजनेमुळे अगदी आपल्या घराजवळ रेल्वेचे तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट मिळू शकते . बेरोजगार युवकांसाठी रेल्वेने तिकीट बुकिंग सेवक योजना सुरू केली आहे . या योजनेत बेरोजगार युवक सहभागी होऊन रेल्वे तिकिटांची विक्री करू शकतील व त्याबदल्यात त्यांना प्रति प्रवासी १ रु . कमिशन मिळणार आहे . मात्र ज्याला तिकीट बुकिंग सेवक व्हायचे असेल त्यांना जवळपास २ लाखाचा खर्च येणार आहे . संबंधित बेरोजगाराला हे केंद्र सुरू करण्यासाठी जागा , फर्निचर आवश्यक आहेच याशिवाय रेल्वेकडे सुरक्षा ठेव म्हणून ५ हजार रुपये , बँक गॅरंटी २० हजार रुपये भरावे लागतील . या केंद्रासाठी कम्प्युटर घेणे , तो मुख्य स्थानकावरील तिकीट केंद्रातील कम्प्युटरशी जोडणे असा खर्च जवळपास ८० हजार रु . येणार आहे . या केंद्रातून विकल्या जाणाऱ्या तिकिटांच्या संख्येवर नव्हे तर प्रवाशांच्या संख्येवर प्रति १ रु . याप्रमाणे त्याला कमिशन मिळणार आहे . या ठिकाणी प्लॅटफॉर्म तिकीट मिळण्याचीही सोय राहील . याशिवाय मासिक सिझन तिकिटाचे नूतनीकरण , ज्येष्ठ नागरिकांना कन्सेशन तिकीट अशा सुविधा राहतील . दररोज आठशेहून अधिक तिकिटांची विक्री होत असेल तर अतिरिक्त केंद्रही उघडता येऊ शकते .

वास्तविक ही योजना २००८ मध्येच रेल्वेने सुरू केली होती . त्यावेळी ४० हजार बँक गॅरंटी व १५ हजार सुरक्षा ठेव अशी रक्कम भरावी लागत होती . आता हे शुल्क कमी करण्यात आले आहे . याशिवाय आजवर प्रति तिकीट कमिशन दिले जायचे . म्हणजे ५ लोकांचे मिळून एक तिकीट असेल तर त्यावर जेवढे कमिशन तेवढेच एका व्यक्तीच्या तिकिटावर मिळायचे . यात सुधारणा करून आता प्रति प्रवाशी १ रु . कमिशन देण्याचे रेल्वेने ठरविले आहे . सध्या वर्धमाननगर व गांधीबाग येथे अशी केंद्रे कार्यरत आहेत .

मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळातील सर्वच स्थानकांवर तिकीट बुकिंग सेवक नेमण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे . इच्छुकांनी डीआरएम कार्यालयातील वाणिज्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे .