Indian Railways News => Topic started by riteshexpert on Jun 29, 2013 - 00:30:28 AM


Title - अजनी रेल्वेस्थानकावर अपंगांसाठी रॅम्प नाही
Posted by : riteshexpert on Jun 29, 2013 - 00:30:28 AM

नागपूर - नागपूरच्या मध्यवर्ती रेल्वेस्थानकाला जागतिक दर्जाचा "लूक' देण्यात येत आहे. बेल्जियम रेल्वे मंडळाच्या प्रतिनिधी मंडळाशी करार करून जगाच्या नकाशावर येईल, असे आधुनिक रूप मुख्य रेल्वेस्थानकाला दिले जाणार आहे. परंतु, मुख्य स्थानकापासून अवघ्या दोन किलोमीटरवरील अजनी रेल्वेस्थानकाचे सौंदर्यीकरण करताना येथे अपंग व्यक्तींना स्टेशनवर प्रवेश करण्यासाठी रॅम्प तयार केला नाही.

मुख्य रेल्वेस्थानकाच्या तुलनेत अजनी स्थानक स्वच्छ आहे. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने अजनीकडे दुर्लक्ष आहे. अजनी स्थानकाचा विकास सुरू असला तरीही प्रवाशांचे सामान तपासण्यासाठी "स्कॅनर' लावण्यात आले नाही. केवळ रेल्वे पोलिस दलाचा एक जवान येथे तैनात दिसतो.

अजनी रेल्वेस्थानकावर आधुनिक शेड, आरक्षण खिडक्‍यांचे नूतनीकरण केले. "ड्रॉप ऍण्ड गो'सारखी सोय येथे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नही झाला. प्रवासी रेल्वेच्या फलाटानजीक थेट वाहने घेऊन जात असल्याचे चित्र दर दिवसाला दिसते. याशिवाय या स्थानकावर अपंग बांधव प्रवासासाठी आल्यानंतर फलाटाच्या दुसऱ्या भागाला जाण्यासाठी कोणतीही सोय या स्थानकावर उपलब्ध नाही. अजनी रेल्वेस्थानकावर प्रवेश करताना रॅम्प तयार करण्यात आले नाही, हे विशेष.

व्हीलचेअरचा अभाव
अजनी रेल्वेस्थानकावर अपंग व्यक्तींसाठी रॅम्प नाही. तसेच अपंगांच्या सोयीसाठी व्हीलचेअरदेखील नाही. यामुळे अपंग व्यक्ती अजनी स्थानकावर येत नसल्याची खंत अपंग कल्याणकारी संस्थेचे वर्मा तेलंग यांनी व्यक्त केली.

प्रत्येक गाडीला थांबा हवा
नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचणाऱ्या काही मोजक्‍याच रेल्वेगाड्या अजनी रेल्वेस्थानकावर थांबतात. सेवाग्राम, वर्धा येथील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात नोकरीसाठी जाण्यासाठी अजनी रेल्वेस्थानकावर कर्मचाऱ्यांची सकाळी प्रचंड गर्दी असते. यामुळे सकाळी अजनी रेल्वेस्थानकावरून जाणाऱ्या प्रत्येक गाडीला येथे दोन मिनिटांचा थांबा हवा; जेणेकरून वर्ध्यासह या भागातील शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सोयीचे होईल, असे मत व्यक्त होत आहे.