Indian Railways News => Topic started by AllIsWell on Jan 25, 2013 - 15:00:04 PM


Title - delhi railway board not cooperating central railway over actodc system | Loksatta
Posted by : AllIsWell on Jan 25, 2013 - 15:00:04 PM

मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण या मार्गावर एसी विद्युत प्रणालीचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर २६ जानेवारीपासून एसी व डीसी अशा दोन्ही प्रणाली असलेल्या ७-८ गाडय़ा आणण्याची घोषणा मरेच्या महाव्यवस्थापकांनी केली होती. परंतु दिल्लीतील रेल्वे बोर्डाच्या हटवादी भूमिकेमुळे महाव्यवस्थापकांचे आश्वासन अंमलात येण्यास खीळ बसली आहे. रेल्वे बोर्डाच्या मध्य रेल्वेशी असलेल्या दुजाभावामुळेच या गाडय़ा येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार या संपूर्ण उपनगरी पट्टय़ात एसी विद्युत प्रणाली सुरू झाली आहे. त्यामुळे प. रेल्वेवर एसी व डीसी अशा दोन्ही प्रणालींवर चालणाऱ्या गाडय़ांची आवश्यकता उरलेली नाही.

तेथे फक्त एसी प्रणालीवर चालणाऱ्या गाडय़ाच लागतात. दुसरीकडे मध्य रेल्वेवर इतके दिवस फक्त कल्याणपासून पुढे एसी प्रणाली कार्यान्वित झाली होती. नुकतेच ठाणे स्थानक परिसराचे रीमॉडेलिंग झाल्यानंतर ठाणे ते कल्याण मार्गाचेही एसी प्रणालीत रूपांतर करण्यात आले. मध्य रेल्वेवरील अनेक गाडय़ा फक्त डीसी प्रणालीवरच चालतात. स्वाभाविकच या गाडय़ा आता सीएसटी ते ठाणे एवढय़ाच पट्टय़ात प्रवास करू शकणार आहेत.

तसेच कल्याणपुढे कर्जत व कसाऱ्याला जाऊ शकणाऱ्या (दोन्ही प्रणालींवर चालणाऱ्या) गाडय़ांची संख्याही मर्यादित झाली आहे. त्यामुळेच पश्चिम रेल्वेकडे पडून असलेल्या दोन्ही प्रणालींमध्ये चालू शकणाऱ्या ७-८ गाडय़ा मध्य रेल्वेला मिळाव्यात, अशी मागणी रेल्वे बोर्डाकडे करण्यात आली होती. रेल्वे बोर्डाने त्यास सुरुवातीस अनुकूलताही दर्शविली होती. परंतु ठाण्यातील रीमॉडेलिंगनंतर प्रत्यक्ष या गाडय़ा मरेकडे हस्तांतरीत करण्याची वेळ आल्यावर रेल्वे बोर्डाने घूमजाव करीत या गाडय़ा देण्यास नकार दिला आहे.

मध्य रेल्वेला या गाडय़ा देण्यास रेल्वे बोर्ड नेमका का नकार देत आहे हे अधिकृतपणे कळू शकलेले नाही. परंतु या नकारामुळे मध्य रेल्वे प्रवाशांचे हाल मात्र आणखी वाढणार आहेत.