Indian Railways News => Topic started by nikhilndls on May 26, 2013 - 00:01:22 AM


Title - स्फोटक घेऊन जाणारी रेल्वे पेटली-नागपूर + विदर्भ-महाराष्ट्र-Maharashtra Times
Posted by : nikhilndls on May 26, 2013 - 00:01:22 AM

वर्धा

नागपूरकडे स्फोटके घेऊन येणारी रेल्वे पेटल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली . सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली . वर्धा जिल्ह्यातील दहेगाव रेल्वे उपविभागाच्या हद्दीत असलेल्या तुळजापूर आणि सिंदीरेल्वे दरम्यान स्फोटके वाहून नेणारी रेल्वे पोहोचली .

सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही रेल्वे सिंदी स्थानकावरून पुढे निघल्यानंतर दोन डब्ब्यांमध्ये प्रचंड स्फोट झाले . एकापाठोपाठ हे स्फोट झाल्याने परिसर प्रचंड दणाणला . रात्री उशिरापर्यंत हे स्फोट सुरू होते . त्यानंतर या डब्यांनी पेट घेतला . स्फोट आणि आग इतकी भीषण होती की ज्या ठिकाणी हे डबे उभे होते , त्याच्या एक किलोमीटरच्या परिसरात आगीच्या झळा जाणवत होत्या .

आगीचे रौद्र रुप बघता कोणीही पुढे जाण्यास धजावत नव्हते . घटनेची माहिती मिळताच सिंदीच्या स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांनी धावाधाव सुरू केली . त्यानंतर अत्यंत जोखीमपूर्ण मोहीम राबवून हे डबे मुख्य रेल्वे ट्रॅकवरून बाजूला करण्यात आले . त्यानंतर संपूर्ण रेल्वे दहेगाव यार्ड परिसरात आणण्यात आली . रात्री उशिरापर्यंत दोन्ही डब्यांमधून स्फोट सुरूच होते . रात्री साडेनऊपर्यंत अग्नीशमन यंत्रणा किंवा रेल्वेची डिझास्टर मॅनेजमेन्ट टीम सिंदीरेल्वेत दाखल झाली नव्हती . वर्धा - नागपूर या मुख्य रेल्वे ट्रॅकवर हा अपघात घडल्याने या मार्गावरून धावणाऱ्या इंटरसिटीसह अनेक गाड्या अन्य मार्गाने वळविण्यात आल्या , तर काही गाड्यांना दहेगाव , तूळजापूर , सिंदी या रेल्वे स्थानकांच्या अगोदरच थांबविण्यात आले होते . ही आग कशामुळे लागली . स्फोटके घेऊन ही रेल्वे पूलगाव येथून नागपूरकडे येत होती की चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीकडून याबाबत नेमकी माहिती मिळू शकली नाही .