Indian Railways News => Topic started by greatindian on May 17, 2013 - 12:00:05 PM


Title - Central railwaw given Intercity rake for 17 hours journey and Sleeper coaches for 4 hours journey
Posted by : greatindian on May 17, 2013 - 12:00:05 PM

पुणे - चार तासांच्या प्रवासासाठी स्लिपर बर्थ असलेली व 17 तासांच्या प्रवासासाठी खुर्च्यांची बैठक व्यवस्था असलेली रेल्वेगाडी मध्य रेल्वेकडून सध्या सोडली जात आहे. त्यामुळे दूरच्या अंतरावरील प्रवाशांची गैरसोय होत असून, नजीकच्या अंतरावरील प्रवाशांना प्रत्येकी 80 ते 115 रुपयांचा आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.

सुट्यांमुळे सध्या प्रवाशांची गर्दी होत आहे, ही बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वेने सुमारे 17 मार्गांवर जादा गाड्या सोडल्या आहेत. त्यातील पुणे-सोलापूर मार्गावरील (गाडी क्र. 01010) रेल्वे गाडी 265 किलोमीटर धावते. सायंकाळी चार वाजून 15 मिनिटांनी ही गाडी पुण्यातून सुटते व रात्री नऊच्या सुमारास सोलापूरला पोचते. तेथून सकाळी दहा वाजून 55 मिनिटांनी सुटते व दुपारी तीनच्या सुमारास पुण्यात येते. पुणे- नागपूर मार्गावरील गाडी (क्रमांक 01030) सुमारे 900 किलोमीटर अंतर पार करते. सकाळी पाच वाजून 20 मिनिटांनी ही जादा गाडी सुटते व रात्री अकरा वाजता ती नागपूरला पोचते. तेथून सकाळी अकरा वाजता ती निघते व पहाटे चार वाजता पुण्यात येते.

पुणे- सोलापूर या चार तासांच्या प्रवासासाठी मध्य रेल्वे स्लिपर क्‍लास असलेली रेल्वेगाडी सध्या सोडत आहे. त्यात फर्स्ट एसीचा 1 डबा, टू-टायर एसीचे तीन डबे व थ्री-टायर एसीचे दोन व द्वितीय वर्ग स्लिपर क्‍लासचे 8 डबे आहेत. मात्र, पुणे- नागपूर रेल्वेगाडीला खुर्च्यांची बैठक व्यवस्था असलेले आठ डबे आहेत. वस्तुतः पुणे- नागपूर हा तब्बल 17 तासांचा प्रवास आहे, तर सोलापूरचा चार तासांचा. नागपूर गाडीतील प्रवाशांना एवढा वेळ बसून प्रवास करणे शक्‍य होत नाही. त्यामुळे त्यांना स्लिपर बर्थ असलेल्या गाडीची आवश्‍यकता आहे, तर सोलापूरच्या प्रवाशांना खुर्च्यांची बैठक व्यवस्था चालू शकते. मात्र, मध्य रेल्वेने नेमके उलटे केले आहे.

त्यातच सोलापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना या हंगामी गाडीसाठी द्वितीय वर्ग स्लिपर क्‍लाससाठी 190 रुपये तिकीट द्यावे लागते. एरवी खुर्ची बैठक व्यवस्था असलेल्या गाडीसाठी त्यांना 110 रुपयेच तिकीट आहे. तसेच एरवीच्या एसी चेअर कारसाठी 390 रुपये तिकीट असते. मात्र, हंगामी गाडीतील थ्री-टायर एसीसाठी प्रवाशांना 505 रुपये द्यावे लागत आहेत. परिणामी पुणे-सोलापूर मार्गावरील प्रवाशांना जादा पैसे द्यावे लागत आहेत. नागपूरच्या गाडीतील प्रवाशांना मात्र गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

"गाड्या हंगामी आहेत!'
याबाबत मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी वाय. के. सिंह म्हणाले, ""सोलापूर, नागपूर मार्गावरील गाड्या हंगामी आहेत. ज्या प्रमाणात रेल्वेगाड्या उपलब्ध होतात, त्यानुसार त्या मार्गावर सोडल्या जातात. तरीही या मुद्‌द्‌याची दखल घेऊन बदल करता येईल का, याबाबत चाचपणी केली जाईल.'' प्रवासी संघटनेच्या अध्यक्ष हर्षा शहा यांनीही मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे विभागातील गोंधळ दूर करावा, अशी मागणी केली आहे.