Indian Railways News => Topic started by Mafia on Oct 07, 2013 - 12:06:37 PM


Title - खेडजवळ 'मांडवी' घसरली
Posted by : Mafia on Oct 07, 2013 - 12:06:37 PM

* रुळाला तडा गेल्याने अपघात
* ड्रायव्हरच्या प्रसंगावधानाने हानी टळली

रत्नागिरी: मुंबईहून मडगावकडे निघालेल्या मांडवी एक्स्प्रेसला रविवारी भीषण अपघात होता होता वाचला. खेडजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याचे एक्स्प्रेसच्या ड्रायव्हरला दिसताच त्याने इमर्जन्सी ब्रेक लावले. वेग कमी झाल्याने फक्त इंजिन व एक डबा रुळांवरून घसरला आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र , या घटनेने कोकण रेल्वे रात्री उशिरापर्यंत विस्कळीत झाली होती.

सकाळी १२.१५च्या सुमारास हा अपघात झाला. त्यांनतर या मार्गावर धावणाऱ्या गाड्या चिपळूण , रत्नागिरी स्थानकावर थांबवण्यात आल्या. नवी मुंबई , मडगाव व रत्नागिरीतील आपत्कालीन पथके घटनास्थळाकडे पोहचली. घसरलेले इंजिन व डबा हलविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

दरम्यान , रुळाला तडा जाण्याचा गंभीर प्रकार तपासणी पथकाच्या लक्षात कसा आला नाही , असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी चौकशी करण्यात येईल , असे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले.

* कोकण रेल्वे विस्कळीत
मुंबईः या अपघातामुळे कोकण रेल्वेमार्गावरील गाड्या पाच तासांहून अधिक विलंबाने धावत होत्या. मत्स्यगंधा एक्स्प्रेसची वेळ बदलण्यात आली. रविवारी रात्री अकरा वाजता सुटणाऱ्या सीएसटी-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेसची वेळ पहाटे सव्वा चार करण्यात आली. याबाबत कोकण रेल्वेच्या प्रमुख जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांच्याशी संपर्क साधला असता , कोणत्याही गाड्या रद्द करण्यात आल्या नसल्याचे त्यांनी सांगितले.