Indian Railways News => Topic started by Mafia on May 13, 2012 - 04:00:11 AM


Title - सीएसटी-पनवेल वातानुकूलित लोकल एमआरव्हीसीचा प्रकल्पअभ्यास सुरू
Posted by : Mafia on May 13, 2012 - 04:00:11 AM

मुंबई - दुर्लक्षित असलेल्या सीएसटी-पनवेल हार्बर मार्गावरील प्रवाशांना भविष्यात वातानुकूलित लोकलची सफर करण्याचे भाग्य लाभणार आहे. हार्बर मार्गावर एसी लोकल चालविण्याच्या दृष्टीने मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) प्रस्ताव तयार करीत असल्याची माहिती एमआरव्हीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सीएसटी-पनवेल मार्ग अनेक वर्षांपासून अविकसित आहे. या मार्गावर बारा डब्यांच्या लोकल धावत नाहीत, जलद मार्ग नसल्याने जलद प्रवासाची सोय नाही. कुर्ला-वाशीदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यास पर्यायी मार्गावर वाहतूक वळविण्याची सोय नाही, अशा अत्यंत गैरसोयीचा असलेल्या या मार्गावर बारा डब्यांच्या गाड्या सुरू करण्यासाठी मानखुर्द-सीएसटीदरम्यान फलाटांची लांबी वाढविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्याचा आराखडा एमआरव्हीसीने तयार केला आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात जलद मार्गाची घोषणा करण्यात आली आहे. नवी मुंबई विमानतळ तयार झाल्यानंतर या मार्गावरील वाहतुकीत होणारी वाढ लक्षात घेऊन हार्बरचा विकास करण्याची रेल्वेची योजना आहे. 2018 पर्यंत सीएसटी-पनवेल वातानुकूलित लोकल चालविण्याची रेल्वेची योजना आहे. यासाठी 225 वातानुकूलित डबे लागणार आहेत. सुमारे 1200 कोटी रुपयांचा हा प्रोजेक्‍ट असल्याचे एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. एमआरव्हीसी वातानुकूलित रेल्वे सेवेचा प्रस्ताव तयार करून लवकरच तो रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.