Indian Railways News => Topic started by riteshexpert on May 10, 2012 - 00:00:08 AM


Title - रेल्वेतील सराईत चोर होणार तडीपार
Posted by : riteshexpert on May 10, 2012 - 00:00:08 AM

रेल्वे पोलिसांकडून प्रथमच कृती
```````````````````
रेल्वे स्टेशन आणि परिसरात धुमाकूळ घालणा-या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी रेल्वे पोलिसांनी कंबर कसली आहे. सतत दहशत माजवून प्रवाशांच्या वस्तूंवर हात साफ करणा-या चोरांवर आता तडीपारीची कारवाई होणार आहे. पहिल्या यादीत पुणे विभागातील १३ जणांचा समावेश आहे. पहिल्यांदाच रेल्वे पोलिसांकडून अशा प्रकारची कारवाई केली जाणार आहे. पुढील सहा महिन्यात कारवाईची प्रक्रिया होण्याची शक्यता आहे.

पुणे रेल्वे स्टेशन, शिवाजीनगर, लोणावळा, दौंड स्टेशनसह रेल्वेमार्गावर लुबाडणुकीच्या घटना वाढल्या आहेत. प्रवाशांच्या बॅग, खिसे, महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि मोबाइलवर डल्ला मारणाऱ्या चोरांनी स्टेशन परिसरात चांगलेच बस्तान बसविले असून, गेल्या वर्षभरात प्रवाशांच्या वस्तू पळविणाऱ्या ९१ चोरांना पोलिसांनी पकडले आहे. दिवसाढवळया प्रवाशांना लुटले जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यात सर्वाधिक घटना महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकाविण्याच्या आणि प्रवाशांच्या बॅग पळविण्याच्या आहेत. तसेच धारदार शस्त्रांचा धाक दाखवून प्रवाशांना लुबाडल्याच्या तक्रारींचीही पोलिसांकडे नोंद झाली आहे. अशा गुन्ह्यातील चोरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्याचा प्रस्ताव रेल्वे पोलिसांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे. त्यानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उपविभागीय दंडाधिकारी रवींद कुलकणीर् यांनी दिली.

' प्रवाशांना धमकावून जबरस्तीने वस्तू पळविण्याबरोबरच त्यांना मारहाण करणाऱ्या गुन्ह्याचे प्रमाण अधिक आहे. सातत्याने गुन्हे केलेल्या गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई होऊ शकते. गेल्या काही महिन्यांत लोहमार्ग परिसरात सातत्याने दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांचे नावे पाठविण्यात आल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.