Indian Railways News => Topic started by riteshexpert on May 10, 2012 - 00:00:33 AM


Title - पोमेंडीवासीयांनी रोखले कोकण रेल्वेचे डोंगर कापण्याचे काम
Posted by : riteshexpert on May 10, 2012 - 00:00:33 AM

रत्नागिरी- विविध मागण्यांना कोकण रेल्वे प्रशासनाने वाटाण्याच्या अक्षता लावल्याने संतप्त झालेल्या पोमेंडीवासीयांनी आज पोमेंडीतील कोकण रेल्वेचे डोंगर कापण्याचे काम रोखले. कोकण रेल्वेचे अधिकारी आणि ग्रामस्थांची यावरून चांगलीच जुंपली; मात्र त्यातून काहीच निष्पन्न न झाल्याने अखेर ग्रामस्थांनी मागण्या मान्य होईतोवर काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

पोमेंडी बुद्रुक हे ठिकाण कोकण रेल्वेसाठी डोकेदुखी ठरले होते. पावसाळ्यात डोंगर कोसळून रेल्वेरुळावर वारंवार दरडी कोसळत असल्याने वाहतूक ठप्प होत होती. त्यामुळे कोकण रेल्वेने पोमेंडी बुद्रुक येथील दोन्ही बाजूंचे रेल्वे रुळावर घसरणारे डोंगर कापण्याचे काम हाती घेतले. सुमारे सात कोटी रुपये खर्चाचे हे काम आहे. त्यासाठी सात जेसीबी, दहा डंपर आणि दोनशे कामगार काम करत आहेत.

आजवर सुमारे अडीच हजार लाख क्‍युबिक मीटर मातीचा उपसा करून रस्त्याच्या उजव्या बाजूला माती डंपिंग केल्याने मोठे ढिगारे तयार झाले आहेत. ही माती पावसाळ्यात रस्त्यावर येऊन रस्ता बंद होण्याची भीती ग्रामस्थांना वाटते. शिंदेवाडीच्या सुमारे 35 कुटुंबांना जवळच्या वहाळात धरण बांधून पाणीपुरवठा केला जात होता. तेथे पाण्याचे नैसर्गिक स्रोत होते. रेल्वे रुळावरील माती काढताना सर्व माती या वहाळात आल्याने येथील पाण्याचे स्रोत बंद झाले आहेत. तर पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे 35 कुटुंबांना पाण्याच्या टंचाईची मोठी झळ बसली आहे. त्यांच्यासाठी रेल्वे प्रशासनाने पाण्याची सोय करून द्यावी, पोमेंडी बुद्रुक रेल्वे पुलापासून ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत गटार बांधून मिळावे, पोमेंडी बुद्रुक रेल्वे पुलाजवळ संरक्षक भिंत बांधावी, आदी मागण्यांसाठी पोमेंडीवासीयांनी 15 ऑगस्ट 2011 ला रेल रोको करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र जिल्हाधिकारी आणि रेल्वे प्रशासनाने काही मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्‍वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले होते; परंतु आजवर रेल्वे प्रशासनाने या मागण्यांची पूर्तता केली नाही.

मातीचे ढिगारे आहे तसे आहेत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, बेकायदा खासगी मालकीच्या जागेत माती टाकण्यात आली आहे, शेतीच्या नुकसानीची भरपाई नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला जाग आणण्यासाठी आज पोमेंडी बुद्रुक ग्रामस्थांनी कोकण रेल्वेचे डोंगर कापण्याचे काम बंद पाडले. बहुजन विकास आघाडीचे जिल्हा संघटक आणि पोमेंडीचे माजी उपसरपंच तानाजी कुळ्ये, सरपंच संजय बारगुडे, उपसरपंच सौ. विजया कांबळे यांच्या नेतृत्वाखाली गजानन धनावडे, के. के. जाधव, दत्ता शिंदे, विजय कांबळे, प्रमोद कांबळे, अमित कांबळे आदींनी सकाळी अकरा वाजता रेल्वेचे काम बंद पाडले.

त्यानंतर कोकण रेल्वेचे अधिकारी श्री. सिद्दाप्पा, रेल्वे पोलिस घटनास्थळी पोचले. ग्रामस्थ आणि रेल्वे अधिकाऱ्यांची जोरदार जुंपली. काम बंद झाले तर रेल्वेला 200 कामगारांना फुकट रोज द्यावा लागणार आहे, त्यामुळे आज काम सुरू ठेवून जिल्हा प्रशासन आणि रेल्वे अधिकाऱ्यांची उद्या बैठक घेऊ, असे श्री. सिद्दाप्पा यांनी सांगितले; मात्र ग्रामस्थांनी त्याला नकार दिला. आमच्या मागण्या उद्या मान्य झाल्या तर उद्या काम सुरू करू, तोवर काम बंद राहील, असे स्पष्ट केले.

काही मागण्या पूर्ण ः सिद्दाप्पा

"आम्ही ग्रामस्थांना दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे माती खाली येऊ नये, यासाठी प्रतिबंधक दगडी बांध घातले आहेत, रुळावरील माती वहाळात अडू नये, यासाठी व्यवस्था केली जाणार आहे. मातीचा ढिगाराही हटविण्यात येणार आहे. अशा पद्धतीने ग्रामस्थांच्या काही मागण्या आम्ही पूर्ण केल्या आहेत'', असे रेल्वेचे अभियंता श्री. सिद्दापा यांनी सांगितले.