Indian Railways News => Topic started by riteshexpert on Jun 19, 2012 - 20:00:08 PM


Title - बुकिंग क्लार्कने लुटीचा डाव उधळला
Posted by : riteshexpert on Jun 19, 2012 - 20:00:08 PM

कल्याण

रविवारी रात्रीची वेळ ... रेल्वे स्टेशनात फारशी गर्दी नव्हती ... रेल्वे काऊंटरवरचे कर्मचारीही दिवसभराच्या कामानंतर सैलावले होते .. अचानक एकजण रेल्वे बुकिंग कार्यालयात घुसला आणि मोठे नाट्य घडले .

कल्याण रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला असलेल्या तिकीट बुकिंग ऑफिसच्या मागच्या बाजूने रविवारी रात्री नऊच्या सुमारास सुभाष माने ( २९ ) आणि प्रमोद कांबळे ( ३२ ) हे दोन चोरटे आत शिरले . प्रमोद हातात चाकू घेऊन दारापाशी उभा राहिला . तर , सुभाषने आपल्याकडील चाकू बुकिंग क्लार्क स्वप्नील पाटील ( २२ ) याच्या पोटाला लावून पैशांची मागणी केली . पैसे न दिल्यास हा चोर आपल्या पोटात चाकू खुपसेल या भीतीपोटी स्वप्नीलने तिकिट विक्रीतून जमा झालेले ५१ हजार रुपये सुभाषच्या हातात दिले .

मात्र हे पैसे घेऊन सुभाष पसार होण्याच्या प्रयत्नात असतानाच प्रसंगावधान दाखवत स्वप्नीलने त्याच्यावर झडप घातली . या झटापटीत सुभाषच्या हातातील चाकू खाली पडला . गडबड पाहून प्रवासी स्वप्नीलच्या मदतीस धावून आले . प्रवाशांच्या मदतीने सुभाषला जेरबंद करण्यात आले . सुभाषने दिलेल्या माहितीच्या आधारे त्याचा साथीदार प्रमोद याला विजयनगर परिसरातून अटक केल्याची माहिती तपास अधिकारी एपीआय रवींद्र देशमुख यांनी दिली .

हा दुसरा प्रयत्न

रेल्वे पोलिस आणि आरपीएफ सारखी सुसज्ज पोलिस यंत्रणा असताना कल्याण स्टेशनमध्ये दुसऱ्यांदा अशा पद्धतीने लुटीचा प्रयत्न झालाय . २२ एप्रिल रोजी कल्याण पश्चिमेतील तिकीट काऊंटरवर अशाच पध्दतीने हल्ला झाला होता . त्यावेळीही चोरांच्या हाती पैसे लागले नसले तरी , बुकिंग क्लार्क राजेंद्रकुमार शर्मा जखमी झाले होते . त्या हल्लेखोरास पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही .