Indian Railways News => Topic started by railenquiry on Feb 25, 2013 - 18:01:03 PM


Title - नागपूर-गोवा थेट रेल्वे सुरू करा
Posted by : railenquiry on Feb 25, 2013 - 18:01:03 PM

नागपूर , म . टा . विशेष प्रतिनिधी

विदर्भातून गोव्याला पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या पाहता नागपूर ते गोवा , अशी थेट गाडी सुरू करण्याची मागणी खासदार विलास मु्त्तेमवार यांनी रेल्वे मंत्र्यांना केली आहे .

' सध्या नागपूरवरून गोव्याला जायचे असल्यास आधी मुंबई आणि तेथून पणजी असे जावे लागते . थेट गाडी नसल्यामुळे मुंबईत गाडी बदलावी लागते . प्रवाशांची संख्या पाहता गोव्यासाठी थेट गाडी सुरू करण्याची गरज आहे . नागपूर - पणजी व्हाया कल्याण अशी ही गाडी सुरू करता येईल . त्यामुळे गोवा आणि विदर्भ या दोन्ही भागातील पर्यटनाला चालना मिळेल . या गाडीला परमधाम एक्सप्रेस असे नाव द्यावे ', अशीही मागणी मुत्तेमवार यांची आहे .

भाड्यात वाढ नको - मोटवानी

दोन महिन्यांपूर्वी रेल्वेमंत्र्यांनी प्रवासी भाडे वाढविले होते . त्यामुळे आता पुन्हा भाड्यात वाढ करू नये , अशी मागणी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या ग्राहक सल्लागार समितीचे सदस्य प्रताप मोटवानी यांनी केली आहे .

अजमेर , हरिद्वार , पंढरपूर , तिरुपती बालाजी , जम्मुतावी या शहरांसाठी नागपूरवरून थेट गाडी सुरू करावी , चेन्नई , कोलकोता , अहमदाबादसाठी दुरांतो एक्सप्रेस सुरू करावी , खाद्यपदार्थांच्या दर्जासाठी गाडीत खासगी कॅटरर्स नियुक्त करावे , स्लिपर क्लासमध्ये मोबाइल चार्जिंगची सुविधा असावी , अशा अपेक्षा मोटवानी यांनी व्यक्त केल्या आहेत .

नरखेड , गोंदियासाठी लोकल सुरू करा - ग्राहक पंचायत

नागपूरवरून नरखेड , गोंदिया , अमरावती , बल्लारपूर या शहरांसाठी लोकल सुरू करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत अध्यक्ष गजानन पांडे यांनी केली आहे . ' नागपूर - अमरावती व अमरावती - भुसावळ अशा दोन पॅसेंजर सध्या धावतात . त्याऐवजी नागपूर - भुसावळ व भुसावळ - नागपूर अशा पॅसेंजर सुरू कराव्या . मालगाड्यांमुळे प्रवाशी गाड्यांना अडथळा निर्माण होतो . मालगाड्यांना प्राधान्य देण्यात येते . त्यावर पर्याय म्हणून बुटीबोरीकडून उमरेड मार्गाने मालगाड्या इतवारीला आणता येतील व तेथून त्या हावडा किंवा दिल्लीकडे जातील . त्यासाठी नागपूर - नागभीड ब्रॉडगेजमध्ये परावर्तित करणे आवश्यक आहे . इतवारी स्थानकांवर प्लॅटफॉर्मची संख्या वाढवावी , नागपूर - कोल्हापूर व कोल्हापूर - नागपूर या दोन्ही गाड्यांना अजनी स्थानकावर थांबा द्यावा , अमरावती - जबलपूर ही गाडी भुसावळ - अलाहाबाद अशी करावी , नागपूर - दिल्ली दुरांतो एक्सप्रेस सुरू करावी , दीक्षाभूमी एक्सप्रेस परभणीहून औरंगाबाद , मनमाड , दौंड , पुणे , मिरज , कोल्हापूर अशी न जाता परभणी , पंढरपूर , मिरज कोल्हापूर अशी जावी . त्यामुळे नागपूरहून पंढरपूरला जायला आणखी एक गाडी उपलब्ध होईल . दुरांतो एक्सप्रेसमध्ये पेंट्री कार आवश्यक आहे ', अशाही मागण्या ग्राहक पंचातयने केल्या आहेत .

शेगाव - गोंदिया इंटरसिटी सुरू करा

नागपूर ते शेगाव व शेगाव ते गोंदिया अशी श्री संत गजानन महाराज इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी काँग्रेसच्या पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष भूषण दडवे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे . २०१० साली महाराजांच्या संजीवन समाधीची शताब्दी होती . त्यावेळीही तत्कालीन रेल्वेमंत्री तसेच खा . मुत्तेमवार यांच्याकडे ही मागणी करण्यात आली . मात्र त्यावर काहीच झाले नाही . किमान आता तरी ही गाडी सुरू करा , असे दडवे यांनी म्हटले आहे .