Indian Railways News => Topic started by RailXpert on Mar 13, 2013 - 12:00:04 PM


Title - सकाळ - तिकिटांऐवजी पाणी तपासणीच जोरात
Posted by : RailXpert on Mar 13, 2013 - 12:00:04 PM

नाशिक - भीषण पाणीटंचाईमुळे रेल्वे प्रशासनाला पाण्याची काटकसर करणे अनिवार्य झाले आहे. सोबत एरवी विनातिकीट प्रवाशांची टेहळणी करणाऱ्या यंत्रणेवर रेल्वेस्थानकावरून पाणी नेणाऱ्यांवर करडी नजर ठेवावी लागत आहे. मनमाड शहरातील पाणीटंचाईमुळे दोन महिने आधीपासूनच विनातिकीट प्रवाशांसोबतच पाण्याचे हंडे, भांडे घेऊन फिरणाऱ्यांच्या शोधाची वेळ आली आहे.

येवल्यासह मनमाडसाठी सोडलेले पाणी मनमाडपर्यंत पोचण्यापूर्वीच निम्मे गायब झाल्याने पाणीप्रश्‍न प्रचंड गंभीर बनला आहे. नागरिकांना पाणी मिळावे म्हणून मनमाडमध्ये आंदोलन सुरू आहे. मार्चमध्येच अशी स्थिती असताना आगामी दोन महिन्यांतील पाण्याच्या दुर्भिक्षाच्या कल्पनेने विविध शासकीय यंत्रणाही हवालदिल झाल्या आहेत. स्वतंत्र आरक्षण असताना रेल्वे प्रशासनाला पाणी संरक्षणाची चिंता सतावत आहे. बाहेर सगळीकडे कोरडे पडलेले असल्याने पाण्यासाठीचे लोंढे रेल्वेस्थानकाचा रस्ता धरू लागले आहेत. प्रवाशांच्या वाट्याचे पाणी वाचविण्यासाठी रेल्वेने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत.

मध्य रेल्वेच्या मार्गावरील प्रमुख स्थानक असलेले मनमाड हे जंक्‍शन आहे. गाड्या धुण्यापासून रेल्वेगाड्यांच्या मुक्कामी थांब्याच्या सोयीमुळे येथे पाण्याचा वापर जास्त होतो. शहरात पन्नास-पन्नास दिवस नागरिकांना पाणी मिळत नसताना, गाड्यांच्या स्वच्छतेसाठी पाण्याचे नियोजन करताना रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडत आहे. यावर उपाय करताना प्रशासनाने रेल्वेस्थानकालगतच्या हद्दीतील तीन विहिरी अधिग्रहीत करीत, त्या स्वच्छ करून त्यांचे पाणी रेल्वे डबे धुण्यासाठी वापरण्याचा मार्ग निवडला. काटकसरीतून पाणीबचत होणार असली, तरी प्रवाशांसाठीचे पिण्याचे पाणी राखणे, हा प्रश्‍न मात्र कायमच असल्याने पाण्याच्या संरक्षणाशिवाय पर्याय राहिलेला नाही.

प्रवाशांना पाणी मिळावे म्हणून कायमस्वरूपी नळांना पाणी न सोडता, रेल्वेगाड्यांच्या वेळेनुसार नळांना पाणी सोडले जात आहे. पण, त्यावरही तासाला नळांना पाणी सोडल्यानंतर त्या वेळेत पाण्यासाठी व्याकूळ असलेले परिसरातील चिमुरडे, महिला हंडे घेऊन रेल्वेस्थानकात शिरकाव करीत आहेत. मात्र, त्यांना प्रतिबंध करण्याची वेळ रेल्वे अधिकाऱ्यांवर आली आहे.

काटकसरीवर अधिक भर
रेल्वेस्थानकामधील पिण्याचे पाणी बाहेर जाऊ नये, यासाठी काळजी घेतली जात आहे. रेल्वे डब्यांची स्वच्छता हा विषय महत्त्वाचा आहे. पिण्यासाठी पाणी नसताना गाड्या धुण्यासाठी पाणी वापरल्यामुळे प्रशासनावर टीका केली जात आहे. यासाठी परिसरातील तीन विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. रेल्वे स्वच्छतेचा विषय मिटला असला, तरी उन्हाची दाहकता वाढत गेल्यानंतर पाणी नियोजनाचे गणितही अवघड होणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांचे म्हणणे आहे.