Indian Railways News => Topic started by riteshexpert on Jun 26, 2013 - 11:30:06 AM


Title - रेल्वे मंत्रालयाला चार महिन्यांची मुदत
Posted by : riteshexpert on Jun 26, 2013 - 11:30:06 AM

- ..तर संप : सहावा वेतन आयोग, पेन्शनसाठी कर्मचारी आक्रमक

मुंबई : सातव्या वेतन आयोगाचे विनाविलंब गठन करणे, नवीन पेन्शन योजना रद्द करून हमी पूर्व पेन्शन योजना लागू करणे, महागाई भत्ता पगारामध्ये विलीन करणे आदी मागण्यांसाठी एनएफआयआर (नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वे मेन) संघटनेने संपाची तयारी केली आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाला चार महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
देशभरातील अनेक संघटना एनएफआयआरशी संलग्न असून, त्यांच्याशी संलग्नित २0 प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक सोमवारी
मुंबई सेंट्रल येथे पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात
आला. देशभरातील संघटनांतील कर्मचार्‍यांचे गुप्त मतदान घेऊन संपाबाबत मत जाणून घेण्यात येईल आणि त्यानंतर संपावर शिक्कामोर्तब करण्यात येईल, असे संघटनेचे महासचिव एम. राघवैया यांनी सांगितले. मात्र, यात कर्मचारी आमच्याच बाजूने असून, देशभरातील १४ लाख कर्मचार्‍यांचा
आम्हाला पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.
आमच्या अनेक मागण्यांवर रेल्वे मंत्रालयाने विचारच केला नसून, त्याचीच आठवण आम्ही त्यांना करून देणार असल्याचेही राघवैया म्हणाले. मागण्यांवर निर्णय घेण्याकरिता पुढील दोन महिन्यांत भारतीय रेल्वेसमोर तीव्र निदर्शने आणि प्रदर्शन केली जाणार आहेत. संप झाल्यास रेल्वेला दिवसाला २,२00 कोटी रुपयांचे नुकसान होण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)