Indian Railways News => Topic started by Mafia on Jul 05, 2013 - 03:01:24 AM


Title - सौर ऊर्जेतून रेल्वेला ऊर्जा
Posted by : Mafia on Jul 05, 2013 - 03:01:24 AM

नागपूर

मध्य भारतात सौर ऊर्जा मुबलक प्रमाणात उपलब्ध असली , तरी तिचा वापर दुर्मिळच आहे . मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाने मात्र सूर्य प्रकाशापासून तायर होणारी वीज वापरून रेल्वे स्थानकांवरील अंधार दूर केला आहे .

पारंपरिक विजेची बचत करण्याच्या उद्देशाने रेल्वेतर्फे विविध उपाय केले जात आहे . सौर ऊर्जेचा वापर हा त्याचाच भाग आहे . नागपूर मंडळाचा विचार केला तर विविध रेल्वे स्थानके , रेल्वेची कार्यालये , रेल्वे कॉलनीज अशी सर्व मिळून ​ दर दिवशी ६० हजार युनिट वीज खर्च होते . यातील १ टक्का वीज जरी सौर ऊर्जेतून मिळाली तरी मोठी बचत होते . नागपूर मंडळातील पांढुर्णा व जुन्नारदेव या दोन्ही रेल्वे स्थानकांवरील प्रकाश १०० टक्के सौर ऊर्जेचाच आहे . ही दोन्ही स्थानके मध्यप्रदेशात आहेत . राज्य सरकारच्या वीज मंडळाकडून वीज मिळण्यात अनेक अडचणी यायच्या . त्यामुळे विजेच्या बाबतीत ही दोन्ही स्थानके रेल्वेनेच स्वयंपूर्ण केली . याशिवाय मंडळात ७५ टक्के रेल्वे गेटवरील दिवे हे सौर ऊर्जेवरील आहेत . रेल्वे चालकांसाठी असणाऱ्या रनिंग रूममध्ये दररोज कितीतरी चालक थांबत असतात . त्यामुळे गरम पाण्यासाठी तेथे सोलर सिस्टीम लावण्यात आली आहे . बल्लारशाह , आमला व माजरी स्थानकावर ही व्यवस्था केली आहे .

गाडी येताच लागतील दिवे

प्लॅटफॉर्मवर गाडी येताच दिवे लागतील आणि गाडी निघून गेले की बंद होतील , अशी व्यवस्था नागपूर रेल्वे स्थानकावर करण्यात आली आहे . हे दिवे सौर ऊर्जेवरील नाही . मात्र वीज बचतीसाठी हा उपाय रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर प्लॅटफॉर्म नंबर १ व २ वर केला आहे . रात्रीच्यावेळी विनाकारण प्लॅटफॉर्मवरील सर्वच्या सर्व दिवे सुरू असतात . त्यात बरीच वीज खर्च होते . त्यामुळे प्लॅटफॉर्मवर गाडी नसताना ३० टक्के लाइट बंद ठेवण्यात येतात . स्थानक परिसरात गाडीचा प्रवेश होताच हे ३० टक्के लाइट सुरू होतात व गाडी निघून जाताच पुन्हा बंद होतात . यामुळेही मोठ्या प्रमाणात वीज बचत होत आहे .

सर्वच स्थानकांचा विचार

आपल्या भागात सौर ऊर्जा मोठ्या प्रमाणात आहे . त्यामुळे त्याचा उपयोग करून घ्यायचे रेल्वेने ठरविले . त्यानुसार सध्या दोन स्थानकांवर तसेच काही रेल्वे कर्मचारी कॉलनींमध्येही सौर ऊर्जेवरील दिवे लावण्यात आले आहेत . रेल्वेच्या बेस किचनमध्ये सोलर कुकर लावायचाही आमचा विचार आहे . रेल्वेला रोज मोठ्या प्रमाणात वीज लागते . त्यातील काही गरज सौर ऊर्जेतून पूर्ण झाली तरी रेल्वेची मोठी बचत होते . मात्र १०० टक्के सौर ऊर्जेचा वापर शक्य नाही . आर्थिकदृष्ट्याही ते परवडणारे नाही .

उदय बोरवणकर , अपर विभागीय व्यवस्थापक , मध्य रेल्वे नागपूर