Indian Railways News => Topic started by AllIsWell on Jan 17, 2013 - 12:00:04 PM


Title - सकाळ - तोट्यातील रेल्वेगाड्या होणार बंद
Posted by : AllIsWell on Jan 17, 2013 - 12:00:04 PM

कोलकता- प्रवासी तिकिटांमध्ये दरवाढ करून ग्राहकांच्या खिशाला चाट लावूनही जमा-खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने रेल्वे आता अनावश्‍यक खर्चाला कात्री लावणार आहे. तोट्याच्या मार्गावरील रेल्वेगाड्या बंद करण्याबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम किंवा इतर उपक्रम तातडीने थांबविले जाणार आहेत. ममता बॅनर्जी यांनी सुरू केलेल्या महत्त्वाच्या मार्गावरील दुरांतो एक्‍स्प्रेसही बंद केल्या जाणार आहेत.

दुरांतो एक्‍स्प्रेस विनाथांबा असल्याने या गाड्यांना विशेष पसंती मिळाली नसल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आल्याची माहिती रेल्वे बोर्डाने दिली आहे. त्यामुळेच हावडा पुरी, अमृतसर-चंडीगड आणि दिल्ली-अजमेर यांसह अनेक मार्गांवरील रेल्वेगाड्या तातडीने बंद केल्या जाणार आहेत. रेल्वे बोर्डाशी झालेल्या चर्चेदरम्यान रेल्वे राज्यमंत्री अधीर रंजन चौधरी यांनी रेल्वेतर्फे साजरे केले जाणारे सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच वृत्तपत्रांना पाने भरून दिल्या जाणाऱ्या जाहिराती तातडीने थांबविण्याचे आदेश दिल्याची माहिती या चर्चेत सहभागी झालेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

रेल्वे खाते 2009 पासून तीन वर्षे तृणमूल कॉंग्रेसच्या हातात होते. ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना तर सांस्कृतिक मेजवान्यांसाठी अनेक कलाकारांना नियमित निमंत्रित केले जात असे. या कलाकारांचे मानधनही काढले जात असे. वृत्तपत्रांना नियमित जाहिरातीही दिल्या जात होत्या. ममता बॅनर्जी कोलकत्यात बसूनच एखाद्या राज्यातील प्रकल्पाचे "रिमोट कंट्रोल'द्वारे उद्‌घाटन करीत यावर मोठ्या प्रमाणात खर्च होत होता, असा दावा रेल्वेतील सूत्रांनी केला आहे.

ममतांच्या आग्रहास्तव अनेक रेल्वेगाड्यांचे रंग बदलून त्यांच्या अंतर्गत सजावटीवर अनावश्‍यक खर्च केल्याच्या तक्रारीही अधिकाऱ्यांनी रेल्वे राज्यमंत्र्यांकडे केल्या आहेत. रेल्वेचे आर्थिक गणित बिघडल्याने आता यापुढे केवळ रेल्वेची सेवा सुधारण्यावरच पैसा खर्च केला जाणार आहे. प्रवाशांची कमतरता असलेल्या मार्गावरील रेल्वेगाड्या बंद करून नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्यासाठी सातत्याने होत असलेल्या मागण्यांचा विचार केला जाणार आहे. दुरांतो एक्‍स्प्रेस बंद केल्यानंतर त्या मार्गावर शताब्दी, इंटरसिटी, जनशताब्दी एक्‍स्प्रेस अशा गाड्या सुरू करता येतील काय, याची चाचपणी केली जात आहे.
--

प्रकल्प बंद करणार!
दोन-चार वर्षांपूर्वीपर्यंत फायद्यात असलेली रेल्वे एकदम तोट्यात कशी गेली, हा प्रश्‍न सर्वांनाच पडला आहे. रेल्वे बोर्ड व रेल्वेच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याचे उत्तर माहीत असले, तरी बोलून अडचणी निर्माण करण्यापेक्षा मौन बाळगणेच ते पसंत करीत आहेत. काही अधिकाऱ्यांनी मात्र रेल्वे राज्यमंत्र्यांकडे कारणमीमांसा केली आहे. त्यातूनच आता केवळ रेल्वेशी संबंधित प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करायचे आणि रेल्वेशी संबंध नसलेले प्रकल्प हाती न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. "शॉपिंग मॉल,' हॉस्पिटल, पीपीपी तत्त्वावर स्टेडियम आदी प्रकल्पांच्या उभारणीच्या घोषणा ममता बॅनर्जी यांनी केल्या होत्या. सध्याच्या अडचणीच्या काळात अशा प्रकल्पांची गरजच काय, असा सवाल अधीर चौधरी यांनी उपस्थित केल्याचे समजते.

""दुरांतो एक्‍स्प्रेस चालक बदलणे किंवा तांत्रिक तपासणीसाठी ठराविक स्थानकांवर थांबतात. तेथे प्रवाशांना गाडीत चढू दिल्यास अधिकचे उत्पन्न मिळू शकते.''
-सुभाष रंजन ठाकूर, रेल्वे बोर्डाचे माजी सदस्य