Indian Railways News => Topic started by Mafia on Jan 12, 2013 - 12:00:03 PM


Title - मेट्रोबरोबरच मोनोही मार्गस्थ
Posted by : Mafia on Jan 12, 2013 - 12:00:03 PM

पुणे - पुण्यातील अंतर्गत वर्तुळाकार रस्त्याच्या म्हणजेच हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिट रूटच्या सर्वेक्षणाचे काम महापालिकेने गेल्याच आठवड्यात मोनार्क कंपनीकडे सोपविले असून त्यानंतर मोनोरेल धावणार असलेल्या या प्रकल्पाचा तपशीलवार प्रकल्प अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात येणार आहे. तसेच शिवाजीनगर ते हिंजवडीदरम्यान लाइट रेल्वे आखण्यासाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम जपानी कंपनीने सुरूही केले आहे. त्यामुळे मेट्रो, मोनोरेल आणि लाइट रेल्वे या तीनही प्रकारांमधील घडामोडी एकाच वेळी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मेट्रोला केंद्राने काल हिरवा झेंडा दाखविल्याने आता स्पेशल परपज व्हेईकल नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी चौदा जानेवारीस नवी दिल्लीत पुन्हा अधिकारी पातळीवरील बैठक होणार आहे. तिच्या पूर्वतयारीसाठी आज मुंबईत अधिकाऱ्यांची बैठक झाल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त महेश पाठक यांनी दिली. मेट्रोला अशी गती येत असतानाच केंद्रीय नगरविकास मंत्री कमलनाथ यांनी मोनोरेलचा प्रस्ताव लवकर पाठवावा, त्यालाही अर्थसाहाय्य दिले जाईल, असे कालच्या बैठकीत सांगितले होते. मोनोरेल ही हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिट रूटवर (एचसीएमटीआर) धावेल. या एचसीएमटीआरच्या जागेचे सर्वेक्षण करणे, भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करणे आदी कामे करायची असून ते काम मोनार्क कंपनीला गेल्या आठवड्यात देण्यात आले आहे. हे काम सहा महिने मुदतीचे आहे. या प्रकल्पासाठीची वीस टक्के जागा ताब्यात आली असून उर्वरित जागेच्या संपादनासाठीची प्रक्रिया होणार आहे. या प्रकल्पाच्या दोन ते चार टक्के जागेवर अतिक्रमण झाले आहे. मात्र हा प्रकल्प पूर्णपणे उंचावरून असल्याने त्याची अडचण येणार नाही, असे पाठक यांनी सांगितले. मोनोरेल मेट्रोला पूरक अशी राहणार आहे.

दरम्यान, शिवाजीनगर ते हिंजवडीदरम्यानच्या लाइट रेल्वेसाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल जपानी कंपनी मोफत करून देत असून तिचे काम सुरूही झाले आहे. ही लाइट रेल्वे जवळपास ट्रामसारखी आहे. मात्र तिला लागणारा खर्च आणि मेट्रोला लागणारा खर्च यांच्यात फारसा फरक नसेल, तर नेमका कोणता निर्णय घ्यायचा, ते नंतर ठरविले जाणार असल्याचे सांगण्यात आले. याचाच अर्थ पुण्यातील सार्वजनिक वाहतूक यंत्रणेतील तीन प्रकारांबाबत एकाच वेळी हालचाली सुरू झाल्या आहेत. यापैकी नेमका कोणता वाहतूक प्रकार गती घेईल, ते लवकरच स्पष्ट होणार आहे.