Indian Railways News => Topic started by ConfirmTicket on Jan 23, 2013 - 18:00:11 PM


Title - मध्य रेल्वेवरही 'एलिव्हेटेड कॉरिडॉर'चा आग्रह धरणार CR
Posted by : ConfirmTicket on Jan 23, 2013 - 18:00:11 PM

मुंबई- मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कल्याण या अंतरासाठी एलिव्हेटेड कॉरिडॉरची उभारणी केली जावी, यासाठी आपण आगामी रेल्वे अर्थसंकल्पीय चर्चेत जोरदार मागणी करणार आहोत, असे स्पष्ट आश्‍वासन ठाणे जिल्ह्यातील खासदारांनी आज दिले. "सकाळ'च्या मुंबई आवृत्तीतर्फे बेलापूर येथील सकाळ भवनात आगामी केंद्रीय अर्थसंकल्पपूर्व चर्चेसाठी ठाणे जिल्ह्यातील खासदारांना व विविध क्षेत्रांतील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी हे आश्‍वासन खासदारांनी दिले.

पश्‍चिम रेल्वेवर एलिव्हेटेड कॉरिडॉर बांधण्यात येणार आहे. तसेच ट्रान्स हार्बर मार्गावरही अशा पद्धतीने कॉरिडॉरची बांधणी होणार आहे. रहदारी पाहता तसाच एक एलिव्हेटेड कॉरिडॉर मध्य रेल्वेवरही होणे गरजेचे आहे, असे खासदार आनंद परांजपे व डॉ. संजीव नाईक यांनी मान्य केले.

चर्चासत्रात रेल्वेसंदर्भातील प्रश्‍नांना मुंबई रेल प्रवासी संघाचे अध्यक्ष मधु कोटियन यांनी वाचा फोडली. ठाणे आणि कल्याण या स्थानकांमध्ये बहुस्तरीय पार्किंगची व्यवस्था करावी, अशी मागणी कोटियन यांनी केली. तशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे परांजपे म्हणाले. उपनगरी प्रवाशांना अपघात झाल्यास संपूर्ण नुकसानभरपाई मिळत नाही, अशीही तक्रार कोटियन यांनी केली. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी मुख्य रेल्वेस्थानकांवर संपूर्ण वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात यावी याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्यावर मुख्य रेल्वेस्थानकांवर 31 मार्चपर्यंत वैद्यकीय मदतीची संपूर्ण व्यवस्था निर्माण करण्यात येईल, असे संजीव नाईक यांनी सांगितले. कल्याण ते पनवेल या रेल्वेमार्गाचे काम युद्धपातळीवर केले जावे, अशी अपेक्षा कोटियन यांनी व्यक्त केली.

यावेळी येत्या 15 फेब्रुवारीपासून ठाणे ते कसारा आणि ठाणे ते कर्जत अशी लोकल सुरू होणार आहे, असे आनंद परांजपे यांनी सांगितले. या लोकलच्या 20 फेऱ्या सुरू करण्याचे व त्या कार्यालयीन किंवा गर्दीच्या वेळेत सुरू करण्याबाबत आपण आग्रही आहोत, असेही ते म्हणाले.

पनवेल प्रवासी संघाचे अध्यक्ष डॉ. भक्तिकुमार दवे यांनी रेल्वेसाठी कायदे वेगळे असल्यामुळे त्यासंदर्भातील प्रश्‍नांची तड लावणे अवघड जाते, अशी तक्रार केली. प्रश्‍नांना त्वरित प्रतिसाद मिळावा, अशी अपेक्षाही दवे यांनी यावेळी व्यक्त केली. त्याचप्रमाणे दुरान्तोसारख्या किंवा कोकण रेल्वेवरील गाड्यांना कमर्शियल हॉल्ट ठेवावा, असेही त्यांनी सांगितले.

चर्चासत्रात खासदार आनंद परांजपे, संजीव नाईक, सुरेश टावरे व बळीराम जाधव सहभागी झाले होते. चर्चासत्राचे प्रास्ताविक "सकाळ' (मुंबई)चे कार्यकारी संपादक पद्मभूषण देशपांडे यांनी तर सूत्रसंचालन सहयोगी संपादक हेमंत जुवेकर यांनी केले. चर्चासत्रात अल्पबचत, पर्यावरण, बांधकाम, प्राप्तिकर, एफडीआय अशा विविध विषयांवरील प्रश्‍नांचा उहापोह झाला.