Indian Railways News => Topic started by ConfirmTicket on Jun 07, 2012 - 18:00:17 PM


Title - कोकण रेल्वेचे 'मिशन मान्सून'
Posted by : ConfirmTicket on Jun 07, 2012 - 18:00:17 PM

दरवर्षी पावसाळी परीक्षेत हमखास नापास होणाऱ्या कोकण रेल्वेने मान्सूनला सामोरे जाण्याची तयारी पूर्ण केली आहे. यात स्टीलचे बोल्टिंग लावणे , वृक्षछाटणी , कचरा उचलणे असे विविध मार्ग अवलंबले गेले आहेत. कोकण रेल्वेवर पावसामुळे पोमेंडी , निवसर येथे दरवर्षी होणारी कोंडी फोडण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. तसेच , प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.

पावसाळ्यात कोकण रेल्वेवरील मार्गावर दरडी कोसळण्यासारख्या अनेक आपत्तींमुळे प्रवाशांचे हाल होतात. या गोष्टी टाळण्यासाठी कोकण रेल्वेतर्फे विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. यंदाच्या वर्षी कोकण रेल्वेने तीन कोटी रुपये खर्च करून मान्सूनपूर्व तयारी केली आहे. त्यासाठी , तज्ज्ञ समितीने दिलेल्या अहवालानुसार अनेक दरडींवर स्टीलचे बोल्टिंग लावण्यात आले आहेत. बोगद्यांमधून होणाऱ्या गळतीची शक्यता गृहित धरून तिथेही काळजी घेण्यात आली आहे. निवसर येथे रेल्वेमार्ग वळवण्यात आल्याने पूर्वीप्रमाणे कोंडी होत नसल्याचा रेल्वेचा दावा आहे. या सर्व मार्गावर पेट्रोलिंग करण्यासह पूल , बोगदे येथे वॉचमन नेमण्यात आले आहेत.