Indian Railways News => Topic started by Jitendar on Dec 08, 2012 - 18:00:47 PM


Title - Railway DRM visit to Nashik road railway station - रेल्वे महाप्रबंधकांच्या दौर्‍यात कामे केल्याचा दे
Posted by : Jitendar on Dec 08, 2012 - 18:00:47 PM

नाशिकरोड-  मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांच्या दौर्‍यात सर्वत्र रंगरंगोटीसह कामे पूर्ण केल्याचाच देखावा दिसून आला. रेल्वेस्थानक, ट्रॅक, सिग्नल, सुविधा आदी बाबींची तपासणी दरवर्षी केली जाते. यंदाच्या तपासणीचा कार्यक्रम दोन महिन्यांपूर्वी जाहीर झाल्यापासून इगतपुरी ते मनमाड दरम्यानच्या स्थानकावरील अधिकारी, कर्मचारी धास्तावलेले होते. महाप्रबंधक सुबोध जैन यांच्याकडून तपासणीनंतर शाबासकी मिळावी यासाठी सर्व स्तरांतून प्रामाणिक प्रयत्न करण्यात आले. स्थानकावरील डागडुजी, रंगरंगोटी, ठिकठिकाणी दुरुस्ती, लाइट, माहिती फलक, उड्डाणपुलाची दुरुस्ती, रंगरंगोटी याशिवाय कामात सुधारणा करण्यात आली होती. स्थानकाला नववधूसारखे सजविण्यात आले होते. रांगोळी, फुलांची तोरणे लावण्यात आली. अपेक्षेनुसार महाप्रबंधक जैन यांनीही या वरवरच्या सुधारणा, सुविधा, वातावरण व कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून अधिकारी व कर्मचारी यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली आणि ते निर्धास्त होऊन परतले.

काही मिनिटात जैसे थे! महाप्रबंधकांची पाठ फिरताच काही सेकंदात स्थानकावर पूर्ववत परिस्थिती बघण्यास मिळाली. आगमनापूर्वी प्रवेशव्दारासमोर वाहने पार्किंगला बंदी घालणार्‍या रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी निघून गेले, प्रवेशव्दारावर लावण्यात आलेले प्रदर्शन, स्वच्छता कर्मचार्‍यांचे काम बंद झाल्याने परिस्थिती पूर्ववत झाल्याचे दृश्य होते. विशेष म्हणजे कधी नव्हे ते सर्व अधिकारी, कर्मचारी गणवेशात उपस्थित होते.

अधिकार्‍यांची उपस्थिती दौर्‍यात भुसावळ मंडल प्रबंधक महेशकुमार गुप्ता, आर. डी. त्रिपाठी, पी. के. सक्सेना, एस. व्ही. इंगळे, पी. के. र्शीवास्तव, चेतन बक्षी, डब्ल्यू.के. प्रधान, प्रवेश शाहू, मालेगावकर, मुकेशकुमार शिवहारे यांच्यासह कुठार आदींचा समावेश होता.

निवेदनांचा पाऊस मध्य रेल्वेचे महाप्रबंधक सुबोध जैन यांच्यावर रेल्वे प्रवासी संघटना व अधिकारी-कर्मचारी यांच्या निवेदनांचा अक्षरश: पाऊसच पडला. धुळ्याचे खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी नाशिक-पुणे रेल्वे मार्गाबाबत, आनंद गांगुर्डे, भारत पाटील यांच्या शिष्टमंडळाने कर्षण मशीन कारखान्यातील व कामगारांच्या विविध समस्यांचे निवेदन यावेळी दिले. व्यापारी बॅँकेचे संचालक हेमंत गायकवाड व बंटी कोरडे यांच्या शिष्टमंडळाने नाशिकरोड रेल्वे स्थानकावरील विविध समस्यांचे निवेदन देऊन चर्चा केली. मनसेतर्फेही निवेदन देण्यात आले.

खासदारांचेही निवेदन रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण, स्वयंचलित जीना, तपोवन व गोदावरी एक्स्प्रेसला प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन जादा डबे, ओढा टर्मिनस असे विषय मार्गी लावणे आदी मागण्यांचा पाठपुरावा खासदार समीर भुजबळ यांनी महाव्यवस्थापक सुबोध जैन यांच्याकडे निवेदनाव्दारे केला.