Indian Railways News => Topic started by RailXpert on Jul 24, 2013 - 09:00:46 AM


Title - - हल्ल्याच्या इशार्‍याच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेत वाढ
Posted by : RailXpert on Jul 24, 2013 - 09:00:46 AM

भुसावळ-  दहशतवादी संघटनांकडून 21 जुलैला हल्ल्याची धमकी मिळाल्याने भुसावळ रेल्वेस्थानकाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने स्थानकावर प्रवाशांच्या साहित्यांची कसून तपासणी केली जात आहे. भुसावळ रेल्वेस्थानकावर ‘हाय अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे.

भुसावळ, जळगाव आणि नांदेड रेल्वेस्थानकावर घातपाती कारवाई होण्याची शक्यता आयबीसह आणि दहशतवादविरोधी पथकाने वर्तवली आहे. त्यानुसार लोहमार्ग अधीक्षकांच्या सूचनेवरून भुसावळ आणि जळगाव स्थानकांवर चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक के.एस. पुजारी यांनी रविवारी सकाळीच भुसावळ स्थानकाची तपासणी केली. त्यानंतर निरीक्षक पुजारी दिवसभर जळगाव स्थानकावर सहकार्‍यांसह तळ ठोकून होते. बॉम्बशोधक पथकासह श्वान पथकाने रविवारीही जळगाव आणि भुसावळ स्थानकांची पाहणी केली. धोक्याच्या इशार्‍यानंतर दोन्ही स्थानकांवरील मुसाफिर खाने, तिकीट खिडकी, मोटारसायकल स्टँड, प्रतीक्षालयासह धावत्या रेल्वेगाड्यांची आरपीएफचे निरीक्षक अजय यादव यांनी तपासणी केली. बंदोबस्तासाठी अन्य ठिकाणांहून पोलिसांची जादा कुमक मागवण्यात आली आहे. लगेज स्कॅनरवर प्रवाशांच्या साहित्यांची तपासणी केली जात आहे. हल्ल्याच्या इशार्‍याच्या पार्श्वभूमीवर नागपूर, गोंदिया, वर्धा, बल्लारशा, भुसावळ, मनमाड, औरंगाबाद आणि नांदेड या रेल्वेस्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

शहरात लॉजेस्ची झाडाझडती दहशतवादी हल्ल्याच्या धमकीने रेल्वे सुरक्षाबल दक्ष झाले आहे. या पार्श्वभूमीवर बाजारपेठ पोलिसांनीही रविवारी सात लॉजेस्ची कसून तपासणी केली. पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांनी शहरात रात्रीची गस्त वाढवून पोलिसांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

रेल्वेस्थानकांवर चोख बंदोबस्त भुसावळसह जळगाव स्थानकाची कसून तपासणी केली. संशयित प्रवाशांवर लक्ष ठेवले जात आहे. दोन्ही स्थानकांवर बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. -के.एस.पुजारी, निरीक्षक, जीआरपी, भुसावळ